सांगोला : पित्याने काही वेळेपूर्वी सासरी सोडलेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवार दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथील विठ्ठल मंदिराजवळ घडला. तिच्या आत्महत्येचे वृत्त समजताच नातेवाइकांचा अश्रूंचा बांध फुटला.
राधिका दऱ्याप्पा गोडसे (वय १८) असे विवाहितेचे नाव असून, या घटनेनंतर संतापलेल्या मुलीच्या नातेवाइकांनी नवऱ्या मुलाच्या घरासमोर गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस कॉन्स्टेबल हजरत पठाण, पोलीस कॉन्स्टेबल बापू झोळ यांनी वेळीच हस्तक्षेप करीत गोंधळावर नियंत्रण आणले. पोलिसांनी पती दऱ्याप्पा मोहन गोडसे व सासू शारदा मोहन गोडसे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
इटकी येथील बिटू बाळू करचे यांची मुलगी राधिका हिचा विवाह नऊ महिन्यांपूर्वी लक्ष्मीनगर येथील दऱ्याप्पा मोहन गोडसे यांच्या समवेत झाला होता. दरम्यान, ८ दिवसांपूर्वी राधिका ही जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी माहेरी इटकीला गेली होती. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास बिटू करचे यांनी राधिकाला सासरी लक्ष्मीनगर येथे घरी आणून सोडले. त्यांनी तेथे पाहुणचार घेऊन परत इटकी गावी परतले. दरम्यान, सासू शारदा गोडसे कामानिमित्त बाहेर गेली होती, तर पती दऱ्याप्पा पोहायला गेला होता. हीच संधी साधून राधिकाने घराच्या दोन्ही खोल्यांना आतून कडी लावून बंद केल्या. साडीने पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला.
काही वेळाने पती दऱ्याप्पा यांनी घरी येऊन घराचा दरवाजा वाजविला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता पत्नी राधिका हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील सोमनाथ नरळे यांना दिली.