काशिनाथ वाघमारे, सोलापूर : लक्ष्याचीवाडी येथून बार्शीला जाण्यासाठी स्थानकावर थांबलेल्या महिलेने हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न करीत असताना अंगावरील ओढणी मागील चाकाखाली अडकून चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला.
राणी विकास कुदळे (वय २४, रा. लक्ष्याचीवाडी) असे बसच्या चाकाखाली सापडून मरण पावलेल्या महिलेचे नाव असून, हा अपघात सोमवार, २४ जून रोजी लक्ष्याचीवाडी या बस थांब्यावर दुपारी १२ च्या सुमारास झाला.
विवाहिता राणी कुदळे या सोमवारी बार्शीला पालेभाज्या खरेदी करण्यासाठी निघाल्या होत्या. बसची वाट पाहत त्या स्थानकावर थांबलेल्या होत्या. दरम्यान, वारदवाडी-बार्शी-भूम एसटी बस (एमएच १४ - बीटी २२६२) त्यांना दिसली. ती बस थांबविण्यासाठी त्यांनी हात दाखविला. त्यावेळी भरधाव बस ही न थांबता पुढे निघाली आणि इतक्यात राणीच्या अंगावरील ओढणी मागील चाकात अडकली. त्याच चाकाखाली त्या चिरडल्या. डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच मरण पावल्या.
अपघाताची घटना समजताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोळवे हे घटनास्थळी दाखल झाले. राणी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले; परंतु, त्यांना तपासून त्या मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातानंतर पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अपघातानंतर पंचनामा आणि शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक घोळवे करीत आहेत.