सोलापूर : कोरोनाच्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हिडिओ शुटींग, जिओ टॅग फोटो अपलोड करून नियमित अहवाल सादर करावा. नियम भंग करणारी मंगल कार्यालये सील केली जातील असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी सांगितले.
आयुक्तांनी मंगळवारी नवे आदेश जारी केले. आपले सभागृह भाड्याने देण्यापूर्वी मालकांनी मनपाच्या विभागीय कार्यालयाकडे दहा हजार रुपये अनामत जमा करावी. कार्यक्रम समाप्त होईल त्यावेळी सर्व नियम व सूचनांचे पालन झाल्याची खात्री करूनच १० हजार रुपये परत दिले जातील. एखादी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडून पहिल्यांदा नियम भंग झाल्यास १० हजार रुपये दंड करण्यात येईल. दुसऱ्यांदा नियम भंग झाल्यास १० हजार रुपये दंड आणि १५ दिवसांसाठी आस्थापना सील होतील. तिसऱ्यांदा नियम भंग झाल्यास १० हजार रुपये दंड आणि पुढील आदेश येईपर्यंत आस्थापना सील करण्यात येईल. विभागीय कार्यालयाकडे १० हजार रुपये न भरता कार्यक्रम सुरू ठेवल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला.