बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : तीनशे स्काऊट, दोनशे डायमंड पुशप, अडीचशेहून अधिक सूर्यनमस्कार यासोबत पाच मिनिटांत एक हजार स्किपिंग तसेच एक हजार बेंच जम्पिंग हे सर्व जीम वर्कआउट महिला मोठ्या कुशलतेने करतात. दहा किलो वजनाचा बॉल घेऊन १२० ते १३० लंचेस मारतात. अवघ्या सात ते आठ मिनिटात दोनशेंहून अधिक किक्स मारतात. हे सर्व वर्कआऊट करताना पुरुषी पैलवानाला घाम सुटतो. दम लागतो. शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या सातशेहून अधिक महिला रोज हे सर्व हेवी वर्कआउट इजी करतात.
सोलापुरातील सुनिताताई सुरवसे यांनी ७०० हून अधिक महिला व युवतींना फिटनेसबाबत प्रशिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे, परदेशातील महिलाही त्यांच्याकडून ऑनलाइन प्रशिक्षण घेतात. ३७ वर्षीय दीपिका सुनील सुरवसे यांनी पाच वर्षांपूर्वी ‘’फॉर हर फिटनेस हब ओन्ली लेडीज जिम’’ची स्थापना केली. सदर जिममध्ये गृहिणी, वर्किंग वुमन त्यासोबत महाविद्यालय युवतींना प्रशिक्षण दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महिला जीम म्हणून या जीमची ख्याती आहे.
भल्यापहाटे उठून जिमला जाणाऱ्या अनेक पुरुषांना आपण पाहतो. जिमला जाणं हे पुरुषांचं काम आहे, महिलांचं नाही या पुरुषी मानसिकतेला छेद देण्याचं काम सोलापुरातील महिला व युवती करताहेत. जिम मधल्या ‘’पुरुषार्थ’’ पणाला चालेंज देत सोलापुरातील अनेक महिला फक्त वजन कमी करणे हा उद्देश न ठेवता फिट अँड परफेक्ट राहण्यासाठी हेवी वर्कआउट करताहेत. त्यांच्या या जिममधील पुरुषार्थाचे कौतुक होतेय. याकरिता दीपिका सुरवसे यांनी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
दीपिका सुरवसे सांगतात, सोलापुरात महिलांकरिता स्वतंत्र जिम नव्हती. जिममध्ये येणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. महिलांसाठी स्वतंत्र जिमची मागणी होत होती. परंतु, कुणीही पुढाकार घेत नव्हते. त्यामुळे मी पाच वर्षांपूर्वी फक्त महिलांसाठी जिम सुरू केले. सोलापुरात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
महिला बनाव्यात बॉडी बिल्डरपुरुष बॉडी बिल्डर मोठ्या प्रमाणात आहेत. नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर बॉडी बिल्डर स्पर्धा होतात. परदेशात महिला बॉडी बिल्डरना खूप चांगला स्कोप आहे. भारतात अलीकडे याबाबत जनजागृती होऊ लागली आहे. महिलादेखील बॉडी बिल्डर व्हावेत, यासाठी मी पुढाकार घेणार आहे. याबाबत महिलांना शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण द्यायला तयार आहे. सोलापुरात याबाबत वातावरण नाही, पण जनजागृती झाल्यास महिलांदेखील नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवरच्या बॉडी बिल्डर बनू शकतात, असे मत दीपिका सुरवसे यांनी व्यक्त केले.