सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका झेडपी शिक्षकासह 4 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर, इतर 5 जणांनी धूम ठोकली. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून जाणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. या कारवाईत 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, कचरेवाडी येथे दिलीप रामचंद्र मेटकरी यांच्या घरासामोर पाटबंधारे विभागाच्या जागेत काही लोक पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असल्याने तेथे छापा टाकला. यावेळी तेथे काही लोक जुगार खेळताना मिळून आले. यामध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी (वय ६४), दत्तात्रय श्रीमंत आवळेकर (वय ४२), दत्तात्रय अंकुश माने, सीताराम मोहन फटे (वय ५४, सर्व रा. कचरेवाडी, ता. मंगळवेढा) यांना जागीच पकडले. तसेच पळून गेलेल्यांमध्ये उमेश उत्तम गवळी (रा. भालेवाडी), बबलू सीताराम शिंदे, लाला काळुंगे, महीपती अंकुश माने, पिंटू माने (सर्व रा. कचरेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर पत्त्याची पाने, रोख १५ हजार ५५० रुपये, चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदरची कामगिरी एसपी तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक आमोल बामणे, उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोहेकॉ. महेश कोळी, पो.ना. विठ्ठल कोळी, पो.कॉ. सोमनाथ माने, पोकॉ मळसिद्ध कोळी व चालक पो.काॅ. समाधान यादव यांनी केली.