सोलापूर : अल्पवयीन मुलीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करुन सूर जुळल्यानं तिच्याशी लग्न केले. यातून पिडित मुलीस अपत्य झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हा प्रकार २०२१ ते आजतागायत घडला. या प्रकरणी पिडितेच्या जबाबानुसार अक्षय अंबादास पोटाबत्ती (वय- २६, सोलापूर) याच्याविरुद्ध अत्याचार आणि बालविवाहाचा गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडिता ही अल्पवयीन आहे. २०२१ मध्ये पिडिता आणि नमूद आरोपीची मैत्री झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. जून २०२२ मध्ये दोघांनी एका मंदिरात गुपचूप लग्न केले. त्यानंतर दोघांच्या सहवासातून ती गर्भवती राहिल्याचे डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणीत लक्षात आले.
शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर पिडितेचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पिडितेचा जबाब घेतला असता सदर पिडितेने सर्व माहिती सांगितली. शासकीय रुग्णालयात ती ११ मे रोजी प्रसूत झाल्याचे सांगण्यात आले. पिडितेच्या फिर्यादीनुसार नमूद तरुणाविरुद्ध बालविवाह कायदा तसेच अत्याचाराचा गुन्हा नोंदला आहे.
दरम्यान फिर्याद नोंदवताच सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सपोनि चंदनशिव यांनी पिडितेची कैफियत ऐकून घेतली. या प्रकरणी अधिक तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक कडू करीत आहेत.