सोलापूर : मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आणि त्यातून मिळणारा बोध हा लेखणीच्या माध्यमातून मांडला जातो. यातून निर्माण झालेले साहित्य म्हणजे पुढील पिढीतील जनसामान्यांचा आरसा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम यांनी केले. सोलापूर जिल्हा साने गुरूजी कथामाला, सोलापूरच्या दशकपूर्ती व सानेगुरूजी पुण्यतिथीनिमित्त समाजकल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मीकमल गेडाम या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरूजी कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे, कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे, सूर्या प्रकाशनचे नागेश सुरवसे, बाबुराव मैंदर्गीकर, आरती काळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवधूत म्हमाणे लिखित ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ४२ साहित्यिकांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमादरम्यान बोलताना लक्ष्मीकमल गेडाम म्हणाल्या की, माणूस पैशाने कधीही श्रीमंत होत नसतो, तो आचार आणि विचाराने मोठा होत असतो. आजच्या युगात पैशासाठी मोठी धावपळ होताना दिसते, मात्र संपत्ती असलेला माणूस अंतर्मनातून कधीही सुखी नसतो. ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकात लेखकाने माणसाच्या अनेक गोष्टींचा परामर्श घेतला आहे. माणसाच्या अंगी असलेला गर्व हा जास्त काळ चालत नाही तो केव्हा तरी गळून पडतो. त्यासाठी भक्तीचा मार्ग कसा लाभदायक आहे याचे चांगले सौदाहरण पुस्तकात आहे असे सांगत जीवनात शिस्त असली पाहिजे तरच मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. अन्यथा भटकंतीला लागलेला जीवन प्रवास पुन्हा सद्मार्गाला जाण्यास वेळ लागतो. मनापासून परमेश्वराची प्रार्थना केल्यास शरीर निरोगी राहते, असेही यावेळी लक्ष्मीकमल गेडाम यांनी सांगितले. आभार उज्ज्वला साळुंके यांनी मानले. -----------------------------४२ साहित्यिकांचा सत्कारशहर-जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्काराने साहित्यिक भारावून गेले होते.
साहित्य म्हणजे जनसामान्यांचा आरसा
By admin | Published: June 15, 2014 12:53 AM