सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आरोग्य साहित्य खरेदीस विलंब करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोन करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना तंबी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी रविवारी थेट पालकमंत्री भरणे यांचे घर गाठले व कैफियत मांडल्यावर ते संतापले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार नाही कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करीत असताना त्यांचे वेतन, सुरक्षा साहित्य, औषधे पुरविण्याकडे जिल्हा परीषदेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले. याबाबत कर्मचारी संघटनेने निवेदन देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे आरोग्य कर्मचारी संतापले. त्यांनी पालकमंत्री भरणे यांच्या अंथुरणे ( जि. पुणे) येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराबाबत कैफियत मांडली.
नुकतीच त्यांनी कोरना परिस्थितीचा आढावा घेतला होता, त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जमादार यांना कर्मचाऱ्यांना तातडीचे साहित्य करण्याबाबत सूचना केली होती पण तरीही आरोग्य प्रशासन गाफील असल्याचे पाहून यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना फोन केला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांना सूचना केली.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन न होणे, जनतेतील उपद्रवी लोकांकडून सरंक्षण, कोरोना साथीच्या काळात सरंक्षण साहित्य किट वाटप करण्याची प्रशासनाला सूचना करण्याची मागणी केली.पालकमंत्र्यांनी तात्काळ सीईओ वायचळ यांना संपर्क करून समस्या निवारण करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी शिवराज जाधव, विजया चव्हाण, प्रकाश बिराजदार, चंदू सुळ, शबाना तांबोळी, सदा बंडगर, नवा कपणे, कमलेश महाजन, बबलू धाबटे, बापू सनस, रेखा पवार, मीनाक्षी शिंगाडे, श्रीकृष्ण घंटे उपस्थित होते.
रात्री साहित्य रवाना...
पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना तंबी दिली. त्यानंतर रविवारी रात्रीच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.