सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल हॉस्पिटल) येथे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते. याबाबतीत महिला व त्यांच्या नातेवाईकांची संवाद साधल्यानंतर प्रसूती विभागाच्या कार्याबद्दल ते समाधानी असल्याचे दिसून आले. मात्र, स्वच्छतागृह बाबत त्यांनी तक्रारी केल्या.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्याच्या अनेक भागातून प्रसूतीसाठी महिला येतात. ग्रामीण भागामध्ये प्रसूतीसाठी अडचणी आल्यास त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच सोलापूर शहरातील महिला देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात. महिलांची नियमितपणे तपासणी केली जाते. डॉक्टर व परिचारिका यादेखील त्यांच्या नेमून दिलेल्या वेळेला उपस्थित असतात. रुग्णांना औषध देणे त्यांची वेळोवेळी तपासणी करणे आदी कामे योग्यरीतीने केले जातात, असा अनुभव रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितला. प्रसूतीसाठी असणारा वार्ड हा स्वच्छ आहे. तिथे नियमितपणे स्वच्छता केली जाते. मात्र, स्वच्छतागृह ही अस्वच्छ असल्याचे महिलांनी सांगितले. त्याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष दिल्यास प्रसूती विभागात आणखी चांगल्या सुधारणा होतील अशी प्रतिक्रिया प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी दिली
ऑपरेशन थिएटर सुसज्ज...
बेड, गादी, बेडशीट हे स्वच्छ असतात. नियमितपणे बदलण्यात येतात. प्रसूती वॉर्डमध्ये फक्त रुग्ण, परिचारिका, सफाई कामगार यांनाच प्रवेश दिला जातो. खूपच महत्त्वाचे काम असल्यास किंवा गरज असल्यास नातेवाईकांना परवानगी नंतरच आत सोडले जाते. गरज पडल्यास प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस सिझर ऑपरेशन थेटर येथे नेण्यात येते येथे देखील व्यवस्था चांगली असल्याचे रुग्णांनी सांगितले.
मी माझ्या तीनही मुलींना प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. त्यांच्यावर योग्य आणि चांगला उपचार करण्यात आला. डॉक्टर, परिचारिका चांगल्या पद्धतीने सेवा करतात. वॉर्डात स्वच्छता देखील आहे. फक्त शौचालय स्वच्छ नसल्याचे माझ्या मुलीने सांगितले.
-महिलेचे नातेवाईक
माझ्या पत्नीची प्रसूती सिझर पद्धतीने करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात गेलो असतो तर खूप पैसे खर्च करावे लागले असते. माझी तेवढी ऐपत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार करण्यात येत आहेत.
- महिलेचे पती
डॉक्टरांचा राउंड वेळेवर होतो का?
- १ प्रसूती विभाग नियमितपणे सुरू असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या २४ तास ड्युटी लावण्यात आले आहे.
- २. डॉक्टर हे युनिट पद्धतीने काम करतात. त्यांना दिलेल्या वेळ राउंड घेतात. यादरम्यान प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या तब्येतीची विचारपूस करतात. इमर्जन्सीसाठी स्पेशालिस्ट डॉक्टर सज्ज असतात.
- ३. परिचारिका यादेखील त्यांच्या नेमून दिलेल्या वेळी हजर असतात. तसेच डॉक्टरांनी सांगितलेले काम व तपासणी (रक्तदाब) वेळेवर करतात.
- प्रसूतीसाठी बेड (लेबर रुम) - १६
- प्रसूती पश्चात उपचार बेड - ४०
- सिझर बेड - ४०