सोलापूर : मटका प्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी याला अखेर सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास हैदराबाद येथे अटक केली. त्याला सोलापुरात आणण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे.
न्यू पाच्छा पेठ कोंची कोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये दि. २४ आॅगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती. पोलिसांना पाहून इमारतीमध्ये मटका घेणारे व अन्य कर्मचारी यांच्यामध्ये पळापळ होत असताना त्यात एका हिशोबनिसचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दरम्यान मटका प्रकरणी मुख्य सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्यासह ४० जणांविरुद्ध प्रथमता गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये मटका बुकी सह मटका एजंट लाईनमन मिळून २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मटक्यातील मुख्य सहा भागीदारांपैकी पुतण्या आकाश कामाठी, पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी, सुरज कांबळे, इस्माईल मुचाले, शंकर धोत्रे या भागीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. सध्या इस्माईल मुच्याले व सुरज कांबळे हे दोघे पोलीस कोठडीमध्ये आहेत. गेल्या एक महिनांभरापासून नगरसेवक सुनील कामाठी याचा शोध घेतला जात होता मात्र तो कुठेही आढळून येत नव्हता. तो हैदराबाद येथे राहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मंगळवारी रात्री समजली होती. रात्रीतून पोलिसांनी हैदराबाद गाठून नगरसेवक सुनील कामाटी याला अटक केल्याचे समजते. सदर चौकशी सुरू असून गुन्हे शाखेचे पोलिस पुढील तपास करीत आहेत.