सोलापूर - आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे आज सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे आगमन झाले. माऊलींसह लाखो वैष्णवांचे जिल्हा वासियांच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी ६़३० वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे माऊलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणात वारकºयांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यामधून गायले जात होते. यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड आदी उपस्थित होते़
विठुनामाच्या जयघोषात माऊलीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 12:31 PM