सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या टीकेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पवारांच्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागेल, असा विश्वास मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. अकलूज येथे मतदान केल्यानंतर बोलताना मोहिते पाटील यांनी पवारांना लक्ष्य केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवारांनी आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका असा टोला मोहिते पाटलांना लगावला होता. त्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या विधानवर टीका केली होती.
दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले? असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजच्या सभेत शरद पवारांना विचारला होता. काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या वाटेवर आहे. अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर, पवार यांनी माढ्यातील सभेत विजयसिंह यांच्यावर जबरी टीका केली होती. त्यानंतर, आता विजयसिंह यांनीही या टीकेवर मौन सोडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील 14 जागांसह देशातील 117 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, लोकशाहीच्या उत्सवात देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत.