सोलापूर : "मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय पूजेचा मान मिळाला. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. आज पाऊस सुरू आहे, माझ्या राज्यातील बळीराजा सुखावला पाहिजे. कुठेही पूर परिस्थिती, अतिवृष्टीची दुर्घटना घडू नये. एवढेच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांसोबत बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हेच साकडे मी विठ्ठलाकडे घातले," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना दिली.
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंदिराचा विकास झाला पाहिजे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व परिसरातील विकासाचा एक विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
कालच मी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व अन्य प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत, केंद्रातील सर्वांनीच मला राज्यात नवीन नवीन योजना राबवा मोठमोठे प्रकल्प राबवून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.