सोलापूर : शहर पाणीपुरवठ्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून दोन कोटी ८६ लाख रुपयांची सुधारणात्मक कामे करण्यात येणार आहेत. या कामांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाने सभागृहाला पाठविले होते. सत्ताधारी नगरसेवकांनी यात गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे हा विषय मागे ठेवण्यात आला. आता मुख्यमंत्र्यांना याबाबत तुम्हीच उत्तर द्या, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी नगरसेवकांना सुनावले.
महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसचिव रऊफ बागवान यांनी तातडीचा विषय मांडत असल्याचे सांगितले. भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र येथे संरक्षक भिंत बांधणे, उजनी-टाकळी, पाकणी येथील रोहित्राकरिता फाउंडेशन बांधणे, व्हीसीबी रूम बांधणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांचा मक्तेदार निश्चित झाला असून वर्क आॅर्डर त्वरित देण्यासाठी मनपा सभेने मंजुरी द्यावी, असे पत्र मनपा आयुक्तांनी दिले होते. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव याबाबत पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. मागील जूनअखेरीस हे प्रकरण नगरसचिवांकडे आले होते.
अंदाजपत्रकीय सभेमुळे हा विषय सभेच्या अजेंड्यावर घेता आला नसल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्पष्ट केले. परंतु, नगरसेवक सुरेश पाटील, काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी हा विषय घेण्यास विरोध केला. जूनमध्येच हा विषय का घेतला नाही, असे नरोटे म्हणाले. यात काहीतरी गौडबंगाल आहे, असा संशय सुरेश पाटलांनी व्यक्त केला. काय गौडबंगाल आहे हे स्पष्ट करा, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी केली.
विषय काय आहे हे माहिती करून घ्या, नंतर विरोध करा, असे सभागृह नेते संजय कोळी, महापौर बनशेट्टी सांगत राहिले. पण गोंधळ वाढल्याने अखेर हा विषय मागे घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा विषय गांभीर्याने घेतला आहे. केवळ नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे हा विषय मागे घेत असल्याचे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.
तांत्रिक समिती नेमा : शिवसेना- विडी घरकूल भागात आठ ते नऊ दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. अधिकारी दाद देत नाहीत. चावीवाले फोन बंद करून बसत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे, असा आरोप महेश कोठे, राजकुमार हंचाटे, प्रथमेश कोठे यांनी केला. पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. पाणीपुरवठ्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यातील तांत्रिक दोष सुधारण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी. यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पाणीपुरवठ्यावरून मला तर लाज वाटते : पाटील - शहरात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होतोय. पूर्वी तीन दिवसाआड पाणी यायचे. आता कधी पाच दिवसाआड तर कधी आठ दिवसाआड पाणी येत आहे. मला तर लाज वाटत आहे. तुम्हाला वाटतेय की नाही माहिती नाही, अशी टीका सुरेश पाटील यांनी केली. चेतन नरोटे यांनी ऐन पावसाळ्यात सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होतोय, ही गोष्टही लक्षात घ्या, असा टोला लगावला.