करमाळा : बागल गटाचे नेते दिग्विजय बागल अगामी नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची भाषा करीत असताना बागल गटाचे विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, नगरसेविका प्रमिला कांबळे व राजश्री माने यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये विद्यमान नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व मुख्याधिकारी वीणा पवार यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. यामुळे नगरपालिकेत राजकीय चर्चा रंगली आहे.
करमाळा नगरपरिषदेची निवडणूक आक्टोबर-नोव्हेंंबरमध्ये होणार आहे. आतापासूनच सर्वच पक्ष व गटाकडून निवडणुकांची तयारी सुरू आहे. बागल गटाचे नेते व मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी गेल्या महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालिकेच्या मागील निवडणुकीत जगताप गटाबरोबर केलेली युती चूकच होती अशी कबुली देऊन होऊ घातलेल्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले होते.
बागल गटाचे स्वीकृत नगरसेवक सचिन घोलप यांनी दोन दिवसांपूर्वीच चुनखडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरच्या उद्घाटनापूर्वीच दुरवस्था झाल्याची टीका केली. बागल गटाचे विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, नगरसेवका प्रमिला कांबळे व राजश्री माने या तिघा नगरसेवकांनी एक पत्रक काढून कोरोना काळात नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केलेल्या नगरपरिषदेने शहरांतर्गत पुणे रोडचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण रस्ता, वृक्षलागवड, सातनळविहीर परिसर व नाना नानी पार्क, आधुनिक शौचालये, ओपन जिम व अपंगास दिलेला निधी यासह विविध विकासकामांचे कौतुक केले आहे. बागल गटाच्या विरोधी पक्षनेत्यांसह दोन नगरसेविकांनी सत्ताधाऱ्यांच्या कामाचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
----
आम्ही विरोधक असलो तरी चांगल्या कामाचे कौतुक करण्यात गैर काय. विरोधक असतानासुद्धा त्यांनी आमची कामे केली आहेत. जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे. यामध्ये राजकारणाचा प्रश्नच येत नाही.
- श्रीनिवास कांबळे, विरोधी पक्षनेते