सोलापूर : डॉ. वैशंपायन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने तोंडाला कागदी चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास एका हॉटेलमध्ये ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. आकाश संतोष जोगदंड (वय २४, रा. चौसाळा, जि. बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
यातील आकाश हा येथील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी शिक्षण घेत होता. २०२० सालात त्याने प्रवेश घेतला होता. गेल्या दोन प्रयत्नात तो अनुत्तीर्ण झाला होता, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनाकडून मिळाली आहे. पोलीस सूत्रांनुसार आकाश ३० मे रोजी गावाकडून सोलापुरात आला होता. सावकर मैदानाजवळील हाॅटेलमध्ये रूम नं. ४ मध्ये थांबलेला होता. सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास त्याने रूममध्ये नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतला. तोंडाला कागदी पट्टी लावल्याच्या अवस्थेत तो आढळून आला.
संबंधित घटना समजताच हॉटेल प्रशासनाकडून तातडीने फौजदार चावडी पोलिसांना खबर देण्यात आली. दरवाजा उघडेना म्हणून तो तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता तो लटलेल्या अवस्थेत दिसला. येथे सुसाईट नोट मिळून आली.त्यातील मामाचा मोबाईल नंबर होता, त्यांना बोलावून घेतले. पंचनामा करुन पंचनामा करण्यात आला दुपारी २ च्या सुमारास शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. सुसाईड नोट मिळाली
आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहून ठेवली होती.या त्याने एमबीबीएस परीक्षेत नापास होत असल्याने स्वत:हून जीवन संपवत आहे, कोणालाही जबाबदार ठरवू नये, म्हटले आहे. तसेच ही गोष्ट अगोदर माझ्या मामांना सांगावी म्हणून त्यांचा मोबाईल क्रमांक नमूद केला होता. आईला भावनिक आवाहन करताना त्याने ‘आई तू व दीदीला सांभाळ’ असे म्हटले आहे.नैराश्येतून केली आत्महत्या
गळफास घेतलेला विद्यार्थी आकाश जोगदंड याने २०२० साली एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. दोन वेळा त्याचे विषय गेल्यामुळे तो अनुत्तीर्ण झालेला होता. त्याच्यासोबतचे अन्य विद्यार्थी तृतीय वर्षासाठी शिक्षण घेत होते. या नैराश्येतून त्याने हे कृत्य केल्याचे सुसाईट नोटमध्ये स्पष्ट झाले आहे.