सोलापूर : जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीचा प्रवेश महाविद्यालयाने रद्द केला आहे. शिक्षण खात्यातील गोंधळामुळे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मागील तीन महिन्यांपासून संबंधितांकडे तक्रार करण्यात येत आहे, मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात विद्यार्थिनीसह तिच्या आई-वडिलांनी धाव घेत न्याय देण्याची मागणी केली.
याबाबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील सूर्यकांत कमळे यांनी लोकशाही दिनात आपल्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणाºयाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश रद्द झालेली मुलगी, पत्नी उपस्थित होते. लोकशाही दिनात फेब्रुवारी महिन्यातच तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लोकशाही दिन घेण्यात आला नाही. निदान आता जातपडताळणीसाठी आवश्यक असणारे रेकॉर्ड शिक्षण विभागाकडून प्राप्त करून देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शामल कमळे यांना एसटी प्रवर्गातून प्रवेश मिळाला होता. जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी त्यांनी संबंधित समितीकडे अर्ज दाखल केला होता. समितीने शाळेतील दाखल्याची चौकशी केली असता शाळेतील रेकॉर्ड नसल्याचे दिसून आले. त्यामुळे समितीकडून पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही. वैद्यकीय महाविद्यालयाने याप्रकरणी प्रवेश रद्द करून भरलेली रक्कमही परत केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील जि. प. प्राथमिक शाळेतील रजिस्टर नमुना क्रं. १ गहाळ असल्याची माहिती मिळत आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी समितीने संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांनाही जबाबदार धरले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे जातपडताळणीसाठी आवश्यक असणारी माहितीच उपलब्ध होत नसल्याने मुलीचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आठ दिवसांत सविस्तर माहिती देण्याचे आदेश- जातपडताळणी प्रमाणपत्राचा विषय जातपडताळणी समितीचा आहे. तरीही याप्रकरणी दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सविस्तर अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहणाºया मुलीस नियमाने मदत करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी उत्तमराव पाटील यांनी दिली.