सोलापूर : ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या नियोजित ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालय, बोरामणीला थेट अमेरिकेहून सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत अनेक वैद्यकीय उपकरणे भेट म्हणून देण्यात आली.
कोरोना काळात याच ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमार्फत अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देत असतानाच अमेरिकेहून थेट ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयापर्यंत सेवा इंटरनॅशनल या संस्थेने ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २ बायपॅप मशीन, पल्स ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, फेस मास्क, पीपीई कीट व ३० अद्ययावत हॉस्पिटल बेड आदी साहित्य पोहोचविण्याचे काम केले.
या सर्व उपकरणांचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. शीतलकुमार जाधव व माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश दुधनी, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरामनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इरन्ना राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला.
सेवा इंटरनॅशनल, अमेरिकेच्यावतीने या सर्व वस्तू ग्लोबल व्हिलेजपर्यंत पोहोचविण्यासाठी मूळचे अक्कलकोटचे, पण सध्या अटलांटा, अमेरिका येथे स्थायिक असलेले डॉ. अजय हौदे यांनी, तर भारतातून हैदराबादचे सेवा कार्यकर्ते आर. के. अनिल, केरळचे डॉ. डी. सरवण, दिल्ली येथील दीपक सिंग, विजय मिश्रा यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य विनील जांभळे, प्राचार्या अस्मा नदाफ, श्री. मल्लिनाथ जळकोटे, डॉ. पूजा जाधव, श्री. आप्पासाहेब घुगले, श्री. अविनाश राठोड, रंजना दुपरगुडे, श्रीमती इंदुबाई सुतार यांचे सहकार्य लाभले.