विलास जळकोटकर
सोलापूर : पावसाळा आणि संसर्गजन्य आजार यांचे अतूट नाते मानले जाते. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहावे लागते. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या चौकशीतून दररोज दीड हजार रुग्णांची तपासणी आणि औषधोपचाराचा ताण असणाºया सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) औषधांची चणचण जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षीच्या औषध बिलापोटी ५.५ कोटी थकले असल्यामुळे पुरवठाधारकांकडून औषधे पुरवण्यास टाळाटाळ होत आहे.
सिव्हिलमध्ये नजीकच्या मराठवाडा, कर्नाटकातील रुग्णही बाह्य आणि आंतररुग्ण विभागात उपचारासाठी येतात. ही संख्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्यात अधिक असते. या काळात डेंग्यू, चिकनगुनिया, विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेकडून पुरेसा औषधसाठा असणे आवश्यक आहे. मात्र जवळपास ९० टक्के रुग्णांचा भार असणाºया शासकीय रुग्णालयात औषधांची चणचण भासू लागली आहे. यासंबंधी शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचा ओढाही सिव्हिलकडे असल्यामुळे शासकीय स्तरावरुन मिळणारे साडेचार ते पाच कोटी अनुदान अपुरे पडत आहे. परिणामी औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
आवश्यकतेनुसार औषध खरेदीचे अधिकार पूर्वी स्थानिकपातळीवर असायचे, मात्र अलीकडे औषध खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हापकिन इन्स्टिट्यूटमार्फत ही औषधे पुरवली जातात. शासकीय रुग्णालयाकडे मिळणाºया अनुदानातून हे बिल त्यांना अदा करण्यात येते. औषधांच्या वाढत्या किमतीच्या तुलनेत मिळणारे अनुदान कमी असल्यामुळे आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही औषध टंंचाई जाणवत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. या तांत्रिक बाबी असल्यातरी सर्वसामान्य रुग्णांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आषाढी वारीपासून संसर्गजन्य आजारांचे औषधांचा साठा मुबलक असल्याचे स्पष्ट करताना जिल्हा शल्यचिकित्सक सुमेध अंदूरकर यांनी यातील साठा केरळ पूरग्रस्त रुग्णांसाठी मदत म्हणून देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
निधीची तरतूद वाढवा- रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून ही गरज भागवून औषधे व तत्सम साहित्य पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. याशिवाय शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम फार पूर्वी निर्धारित केलेली आहे. रुग्णांची संख्या विचारात घेता या निधीतून पुरेसा साठा मिळण्यास अडचण भासते़ यासाठी निधी वाढवून मिळण्याची मागणीही प्रशासनाकडून होऊ लागली आहे.
बाहेरुन आणावी लागतात औषधे- शासकीय रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णांना पुरेसे औषध नसल्यामुळे बाहेरुन मागवण्याची वेळ येत असल्याचे प्रत्ययास येत आहे. या संदर्भात बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला. प्रशासनाशी चर्चा करता साठा नसल्यास रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने ते मागवण्याची आवश्यकता असते म्हणून वेळ येत असल्याचे सांगण्यात आले. शासनस्तरावरुन अत्यावश्यक बाब म्हणून कार्यवाही व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.