तुंगतमध्ये आढळला बंगाली बोगस डॉक्टर
पंढरपूर : गेल्या सात वर्षापासून अवैधरीत्या वैद्यकीय धंदा करून तुंगत (ता. पंढरपूर) व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या बोगस डॉक्टरावर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी बुधवारी कारवाई केली. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र आढळले नाही.
१ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी साडेबाराच्या आसपास पोलीस तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रमोद जावळे, तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत नवत्रे, पंढरपूर उपविभाग पाेलीस अधीक्षक विक्रम कदम, फौजदार मोरे, हवालदार सतीश सर्वगोड, फिरोज मणेरी यांचे पथक बोगस डॉक्टरांची तपासणी करण्यासाठी तुंगत गावामध्ये गेले. यावेळी या पथकाला गावातील एस.टी. स्टँडजवळ खंडेराव उत्तम रणदिवे यांच्या मालकीच्या खोलीत संबंधित डॉक्टर मिळून आला. चौकशीअंती त्याचे नाव रॉय बिवास बिरेन (वय ३८, रा. घाट पातीला, ता.वनगाय, जि. चोवीस परणाना, पश्चिम बंगाल, सध्या रा. तुंगत) असे समजले.
पथक पोहोचले तेव्हा त्या रुग्णालयात एक महिला रुग्णाला सलाईन लावलेले होते. रुग्णाला औषध उपचारासाठी डायक्लो फॅनिक, डेम्जा मिर्थेसॉन व अन्य औषधे त्याच्याजवळ आढळून आली. तपासादरम्यान गेल्या सात वर्षांपासून तो रुग्णांवर उपचार करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलेेे.
----
नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ताच नाही
तपासणी पथकाने संबंधित डॉक्टर ज्या पॅथीचे उपचार करतो त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ किंवा इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९६५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राबाबत विचारले. त्याच्या दवाखान्यामध्ये दर्शनी भागावर कोठेही नोंदणी प्रमाणपत्र लावले नव्हते. त्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले.
---
वैद्यकीय कायद्यान्वये नोंदवला गुन्हा
संबधित अधिकारी व गावकऱ्यांसमोर या घटनेचा पंचनामा करण्यात आला. दवाखान्यात सापडलेली औषधे व खरेदी केलेल्या औषधांची बिले पाहता ते मॉडर्न मेडिसीन म्हणजे ॲलोपॅथीचा व्यावसाय करत असल्याचे दिसून आले. मात्र असा व्यवसाय करण्यासाठी लागणारे वैद्यकीय पदवी व नोंदणी प्रमाणपत्र त्यांच्याकडे मिळून आले नाही. यामुळे त्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६चे कलम १५(२) व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (२) नुसार तसेच भादवि कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.
-----
०२ पंढरपूर
तुंगत (ता. पंढरपूर) येथील बोगस डॉक्टरच्या रुग्णालयातील तपासणी करताना तालुका आरोग्य निरीक्षक डॉ. एकनाथ बोधले व पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम.