सोलापूर : ६० वर्षांची परंपरा असलेल्या विजापूर वेस येथील मीना बाजारात यंदाच्या वर्षीही खरेदीसाठी हिंदू-मुस्लीम बांधवांची झुंबड उडाली आहे. विविध ड्रायफु्रट्स, अत्तरे, कपडे यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी जोरदार गर्दी होत आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मीना बाजार भरविला जातो. बाराईमाम चौक, किडवाई चौक, बेगम पेठ या भागात हा बाजार भरतो. ईदच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या बाजारात सध्या ४५० ते ५०० स्टॉलधारक आहेत़ यामध्ये पायांतील चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाºया सर्व वस्तूंचा समावेश आहे.
संसारोपयोगी भांडी, खाद्यपदार्थ कमी किमतीत या ठिकाणी मिळतात. बाजारात लातूर, उस्मानाबाद, विजापूर, पंढरपूर व स्थानिक व्यापारी स्टॉल लावून बसतात. योग्य किमतीत भरपूर खरेदी मीना बाजारात करता येते. खरेदीसाठी शहर व जिल्ह्यातून मोठी गर्दी होत आहे. किडवाई चौकातील बेगम बाजारही फुलला आहे. २००० साली महंमदहुसेन डोका यांनी या बाजाराची स्थापना केली. २००८ मध्ये बाजाराचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. सुरुवातीला फक्त महिलांसाठी प्रवेश होता, मात्र आता सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या ८० ते ८५ स्टॉल लावण्यात आले आहेत.
ड्रायफ्रुट्सच्या मागणीत वाढ- शिरखुर्मा तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायफु्रट्सला यंदाच्या वर्षीही मागणी वाढली आहे. बदाम, काजू, मावा, मनुके, पिस्ता, चारोळी, अक्रोड, मंगजबी, खारीक, अंजीर, खिसमिस, बडीसोप, ईलायची, खसखस, शेवईला मागणी आहे. शेवईमध्ये अहमदाबादी, फेणी, मोगलाई आदींचा समावेश आहे. केशर, नमकिन पिस्ता, जरदाळू, काला मनुका, अफगाण मनुका यालाही ग्राहकांची पसंती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १८ टक्के जीएसटीमुळे १५० ते २०० रूपयांनी ड्रायफ्रुट्सच्या किमती वाढल्या आहेत, अशी माहिती मसाल्याचे व्यापारी महिबूब वजीर बागवान यांनी दिली.अत्तराचे साबण...- आत्म्याचं अन्न म्हणजे ‘रू की गीजा’ अशी ओळख असलेल्या अत्तराला दरवर्षी मोठी मागणी असते. ग्रीन मुश्क, चॅलेंज, ओन्ली वन, गुलनाज, गुलमोहर, डी लव्ह, फिरदोस, असिल, रॉयल प्रोफेसी, तुफान, हुदा आदी १०० प्रकारचे अत्तर सध्या मीना बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. २० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत अत्तराची किंमत असून, रमजानमध्ये याला खूप मान असतो. यंदाच्या वर्षी प्रथमच अत्तराचा साबण बाजारात दाखल झाला आहे. अत्तराचा साबण ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे, अशी माहिती अब्दुल शकुर शेळगीकर यांनी दिली.
रमजान ईदमध्ये मीना बाजार ही ग्राहकांसाठी एक पर्वणी असते. या बाजारात नागरिक मनसोक्त खरेदी करतात. बाजारातील व्यापारी जास्तीचा नफा न पाहता एक भक्ती म्हणून व्यवसाय करतात. बाजारात फक्त मुस्लीमच नव्हे तर सर्व धर्माचे लोक खरेदी करण्यासाठी येतात. बाजारात एकाच छताखाली सर्व वस्तू मिळतात़ त्यामुळे ग्राहक समाधानी होतो़ रमजान ईद मोठ्या आनंदात साजरा केला जातो. महंमदसलीम इब्राहिम हिरोली, अध्यक्ष, मीना बाजार कमिटी, विजापूर वेस.
गुलबर्गा आणि हैदराबाद येथे फक्त महिलांसाठी वेगळा मीना बाजार भरविला जातो. त्याच धर्तीवर किडवाई चौकात बेगम बाजार भरविण्याचा प्रयत्न केला होता. सुरूवातीच्या काळात ३ वर्षे हा प्रयोग यशस्वी ठरला, मात्र काही अपरिहार्य कारणास्तव नंतर बेगम बाजार सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. - महंमदहुसेन डोका, संस्थापक, बेगम बाजार, किडवाई चौक.
तीन हजार रुपये किलोचे खजूर...- रमजान महिन्यात उपवासानंतर खाण्यासाठी आवश्यक असलेले खजूर विक्री करणारे स्टॉलही बाजारात आहेत. १00 रुपयांपासून ३ हजार रुपयापर्यंत किलो खजूर विक्रीसाठी आहेत. मरियम, सुल्तान, रतन, मोजरब, केमिया, फरीद, कलमी, कफकफ आदी विविध प्रकारचे खजूर बाजारात आहेत. आजवा खजूर २८00 ते ३000 रुपये किलो आहेत. खजुराला मोठी मागणी असल्याची माहिती शमशोद्दिन नदाफ यांनी दिली.
ज्वेलरी खरेदीसाठी महिलांची झुंबड...- ईदमध्ये महिलांना सजण्यासाठी आवश्यक असलेली ज्वेलरीची विक्री करण्यासाठी अनेक स्टॉल सजले आहेत. कानातील विविध फुले, गळ्यातील आकर्षक दागिने, हातातील बांगड्या, नेलपेंट आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- सणातील आकर्षण असलेली मेहंदी विक्री करणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. नर्गिस, कॅटरिना, करिना, प्रेम दुल्हन, हिना आदी विविध प्रकारच्या मेहंदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- - लहान मुलांपासून मोठ्या पुरुषांपर्यंत सर्वांसाठी बेल्ट, पॉकेट, गॉगल्स, चप्पल, बूट, सँडेल विक्रीचे स्टॉल लागले आहेत.
- - महिलांचे खास आकर्षण असलेल्या बांगड्या खरेदीसाठी गर्दी होत असून यामध्ये जयपूर आणि हैद्राबादी बांगड्यांना मोठी मागणी आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्तरमजान ईदनिमित्त विजापूर वेस, किडवाई चौक, बेगम पेठ, लक्ष्मी मार्केट आदी भागात मीना बाजार व बेगम बाजार भरविण्यात आला आहे. बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजापूर वेस येथे फिक्स पॉइंट असून, अधिकची पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. पोलीस सातत्याने बाजारपेठेत फेरफटका मारत असतात. महिला पोलीस कर्मचाºयांचाही समावेश आहे. रस्त्यावर गर्दी झाली की ती कमी करण्यासाठी पोलीस तत्काळ जागेवर पोहोचतात.
वाहन मार्गात बदलमीना बाजारमुळे विजापूर वेस, किडवाई चौक, बेगम पेठ, बाराईमाम चौक, बाकळे प्रेस, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, पेंटर चौक, रंगरेज बोळ, माणिक चौक ते विजापूर वेस रोड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनांसाठी माणिक चौक-समाचार चौक, भावसार पथ, बाराईमाम चौक-किडवाई चौक मार्गे बेगमपेठ पोलीस चौकी, पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट, दत्त चौक आदी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दि.१६ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अशी वाहतूक व्यवस्था राहणार आहे.
छोटे व्यापारी रस्त्यावर...मीना बाजारात रस्त्याच्या मधोमध छोटे व्यापारी स्टॉल लावून बसतात. सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळतात. रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या व्यापाºयांना पोलीस उठवतात, मात्र ते पुन्हा तिथेच येऊन आपला व्यवसाय करतात. या व्यापाºयांना पर्याय नसतो, मात्र ते मोठ्या चिकाटीने व्यापार करताना दिसून येतात.
एक लिटर दुधात एक पॅकेट घाला सीताफळ रबडी तयारएक लिटर दुधात २00 ग्रॅमचे पॅकेट टाकले की नैसर्गिक, चविष्ट सुंदर अशी सीताफळ रबडी तयार होते. यंदा प्रथमच सीताफळ रबडीचे उत्पादन बाबा ट्रेडर्सचे मुश्ताक बच्चेभाई यांनी तयार केले आहे.
रमजान ईदनिमित्त दरवर्षी आपली वेगळी ओळख निर्माण करणारे बच्चेभाई यांनी सीताफळ रबडीची भेट देऊन ग्राहकांना समाधानी केले आहे. कुबानीका मिठ्ठा, बाबाका शिरखुर्मा, नानी के गुलगुले आदीसह विविध प्रकारचा खिचडा तयार करणारे पदार्थ लोकप्रिय ठरले आहेत. यंदाच्या वर्षी ईदनिमित्त वेगळे पदार्थ देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुश्ताक बच्चेभाई यांनी सीताफळ रबडीबरोबर दाल वडे व पकोडे तयार केले आहेत. अर्धा कप पाणी घातले आणि थोड्या वेळाने तळले की खमंग दालवडे तयार होतात. एक कप पाणी घालून तळले की मिक्स पकोडे तयार होतात. ही किमया फक्त बच्चेभाई यांच्या उत्पादनामध्ये आहे.
दोन्ही पदार्थांमध्ये कांदा, लसूण, आद्रक, कोथिंबीर या सर्व तयार मसाल्यासह तयार करण्यात आलेले उत्पादन लोकप्रिय ठरत आहे. खास रमजाननिमित्त खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. विविध प्रकारच्या फालुद्यामध्ये स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, मँगो, पिस्ता आदींचा समावेश आहे. १२ वीनंतर काय करायचे हा प्रश्न पडलेल्या मुश्ताक बच्चेभाई यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. रमजानमध्ये ग्राहकांना काहीतरी नवीन द्यायचे म्हणून ते दरवर्षी वेगळा प्रयोग करतात.