सोलापूर : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे आणि समाजकल्याण अधिकारी विजय लोंढे यांच्या मुद्यावरून झालेली जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. शिक्षणाधिकाºयांवर असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच सभागृहात वाचला गेला. असा भ्रष्ट अधिकारी काय कामाचा, अशी टिप्पणी करीत त्यांच्या निलंबनाची आणि समाजकल्याण अधिकारी कामांबद्दल स्वत:च उदासीन असल्याने त्यांचा पदभार काढण्याची मागणी या सभेत करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील, बांधकाम सभापती विजय डोंगरे, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, पक्षनेते आनंद तानवडे यांच्यासह समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. राष्टÑवादी काँग्रेसचे पक्षनेते उमेश पाटील आजही नेहमीप्रमाणेच फॉर्मात होते. त्यांनी या दोन्ही अधिकाºयांविरोधात तक्रारी करून खळबळ उडवून दिली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी नगरपालिकेत कार्यरत असतानाही नियमबाह्य पदोन्नत्या, विनाअनुदानित शाळांना नियमबाह्य मान्यता देण्याचे प्रकार केले आहेत. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून, चौकशी सुरू आहे, असे सांगत त्यांनी सभागृहाला पत्रही सादर केले. असा भ्रष्टाचारी अधिकारी या जिल्हा परिषदेत पदावर राहिला तर जिल्हा परिषद बदनाम व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे त्यांना या पदावरून हटविण्याची जोरदार मागणी पाटील यांनी केली.
समाजकल्याण अधिकारी विजय लोंढे यांच्याविरोधातही सभागृहात उमेश पाटील यांनी तक्रार उपस्थित केली. समाजकल्याण विभागावर सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते; मात्र अधिकारी स्वत: उदासीन आहेत. समाजकल्याण विभागामार्फत समता पंधरवडा जिल्हा परिषदेत पार पडला; मात्र कुण्याही पदाधिकाºयांना या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही नव्हते, एवढेच नाही तर स्वत: अधिकारीच गैरहजर होते. त्यावरून त्यांची या कामाप्रती तळमळ लक्षात येते. या पदावरून त्यांची उचलबांगडी करा, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. त्यांनी सभागृहात ही तक्रार करण्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडेही लेखी तक्रार केली. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागेचा योग्य उपयोग करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभापतींच्या अखत्यारित एक समिती गठित करण्याचे या सभेमध्ये ठरले.
उत्पन्नवाढीसाठी पेट्रोलपंप उघडणार- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील मोक्याच्या जागांवर पेट्रोलपंप उघडण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सध्या अनुत्पादक असलेल्या जागांवर पंप उभारण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.