सोलापूर : मागणी करूनही आचारसंहितेच्या आधी सभा का बोलाविली नाही म्हणून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने शुक्रवारी दुपारी आयोजित केलेली झेडपीची सभा तहकूब करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली.
झेडपीची सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी व आयत्यावेळच्या विषयात पाणीटंचाईचे विषय घेतले जाणार असल्याचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले. सभेच्या प्रारंभीच पक्षनेते आनंद तानवडे यांनी आजची सभा कशासाठी बोलाविण्यात आली आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यापाठोपाठ मदन दराडे, सचिन देशमुख, अरुण तोडकर, वसंत देशमुख उठले व त्यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला.
सुभाष माने म्हणाले आचारसंहितेच्या आधी सभा का घेतली नाही. ३२ सदस्यांनी बजेट सभा घेण्याबाबत पत्र दिले होते. पण प्रशासनाने त्याला उत्तर दिले नाही. राज्यातील ३४ पैकी ३२ झेडपींनी बजेट मांडले. महापालिका, लोकसभा आणि विधानसभेचे बजेट झाले मग झेडपीचे बजेट का लांबविले. आता अधिकाºयांच्या हातात बजेट गेले आहे. तुम्ही आमची चेष्टा करता का. मग ही सभा कशासाठी बोलाविली, आम्हाला काम नाही म्हणून का. त्यावर उपाध्यक्ष पाटील यांनी यासाठी विशेष सभा बोलावू असे सांगितले.
पण तोवर सर्व सदस्य संतप्त झाले. सचिन देशमुख म्हणाले, आम्ही मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणार नाही, सभा तहकूब करा. त्यावर सर्वजण जागेवरून उठले व आम्ही सभात्याग करतो असा इशारा देत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. समयसूचकता दाखवित उपाध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे घोषित केले.
महिला सदस्यांची उपस्थितीआजच्या सभेला झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे हे उपस्थित नव्हते. तसे त्यांनी प्रशासनाला कळविले होते. तसेच चेन्नई येथील कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड गेले आहेत. बारामती येथील कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच सदस्य अनुपस्थित होते तर महिला सदस्यांची उपस्थिती मोठी होती. सदस्यांच्या गोंधळामुळे पाणी टंचाईचे विषय बाजूला राहिले.