लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : स्व. गणपतराव देशमुख हे विधिमंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच गणपतराव यांचे स्मारक उभारणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. फडणवीस म्हणाले की, राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव देशमुख होते, त्यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम केले.
सन्मानाने जगायचे शिकविले : पवार
सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्यामार्फत न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली. दुष्काळी भाग असला तरी मानाने कसे जगायचे हे तालुक्यातील लोकांना स्व. गणपतरावांनी शिकविले, असे शरद पवार म्हणाले.