सांगोला (जि. सोलापूर): महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील अभ्यासू, जमिनीशी नाळ जोडलेले जनतेचे नेते स्व. गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळाची उंची वाढविण्याचे काम केले. अशा तत्त्वनिष्ठ व्यक्तीचे उचित स्मारक महाराष्ट्र विधान मंडळात बनविले पाहिजे. त्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगोल्यात येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान अवताडे, जयकुमार गोरे, राहुल कुल, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.
---
कदाचित आबांना मत देण्यास आवडले असते
स्वर्गीय गणपतरावांची मोठी राजकीय परंपरा आहे. या काळात त्यांच्या परिवाराने त्यांना साथ दिली ही देखील खूप मोठी बाब आहे. अनेक संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाने काय भूमिका घ्यायची हा ज्यांचा त्यांचा विषय आहे, परंतु आबासाहेबांसारखी माणसं पक्षविरहित आहेत. कदाचित त्यांना मत देण्यास मला आवडले असते, असे फडणवीस म्हणाले.
---