सतीश बागल
पंढरपूर : साने गुरूजी यांनी श्री विठ्ठल मंदिरात मागासवर्गीयांना प्रवेशासाठी दि. १ ते १० मे १९४६ साली सलग १० दिवस उपोषण केले. हे उपोषण म्हणजे परिवर्तनाची सुरूवात होती. या सानेगुरुजींचे ज्या ठिकाणी त्यांनी उपोषण केले तेथे आता स्मारक होणार आहे. साने गुरुजींच्या उपोषणासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचीदेखील मदत झाली. लोकसभेचे तत्कालीन सभापती मावळणकर यांनी पंढरीत येऊन यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतरच्या काळात सर्व जातींतील मंडळींना मंदिरातील प्रवेश खुला झाला. साने गुरूजींची जयंती साजरी होत असताना समानतेसाठी त्यांनी केलेले काम राज्यातील जनतेसाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे.
साने गुरूजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मागासवर्गीयांना मिळावा यासाठी उपोषण करीत असताना राज्यभर जनजागृती केली होती. येथील स्टेशन रोडवरील संत तनपुरे महाराज मठात हे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उपोषणाला जनमानसातून चांगला पाठिंबा मिळाला. सहा दिवस उपोेषण झाल्यानंतर प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने उपोषणाला पाठिंबा देत साने गुरूजींचे काही कमीजास्त झाल्यास त्याला सरकार जबाबदार असे सांगत सर्व बाजूंनी दबाव वाढविला होता. त्यानंतर त्यावेळी मंदिरात असणारे उत्पात तसेच बडवे यांनी मागासवर्गीय समाजास मंदिर प्रवेशास होकार दिला. त्यावेळी तत्कालीन आ. तात्यासाहेब डिंगरे तसेच इतर समाजसुधारक उपस्थित होते. श्री विठ्ठल मंदिरातील प्रवेशानंतर गावागावातील पाणवठ्यावर मागासवर्गीयांना पाणी भरता येईल, सर्वत्र समानता येईल, अशी साने गुरूजी यांची भावना होती.
सनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. मात्र, हा विरोध झुगारत हे आंदोलन यशस्वी झाले. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती. साने गुरूजींविषयीची माहिती देताना नंदकुमार कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात साने गुरूजी यांनी तुरूंगवास भोगला. अंमळनेर येथे काही दिवस नोकरी केली. सुसंस्कारित पिढी घडावी यासाठी शामची आई या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. आईचं अंतकरण असणाºया साने गुरूजी यांनी समाजात समानता यावी, सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
संत तनपुरे मठ क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार- साने गुरूजी यांनी मागासवर्गीयांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी संत तनपुरे महाराज मठातील चारोधाम मंडपात दहा दिवस उपोषण केले. ज्या ठिकाणी उपोषण केले, त्याठिकाणी साने गुरूजी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील बालविकास मंडळ तसेच इतर संस्थांकडून प्रस्ताव आला असल्याचे ह.भ.प. बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले. संत तनपुरे महाराज मठ अनेक क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार आहे. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना याच ठिकाणी झाली. तत्कालीन राष्टÑपती राजेंद्र प्रसाद तसेच प्रतिभाताई पाटील यांनी याठिकाणी भेट दिली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना याठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.