मार्च संपत आला तसे प्रत्येकाला सुट्यांचे वेध लागले. या सुटीत बाहेरगावी जावं, छान ट्रीप करून यावी हा प्लॅन पक्का होता. मग नेहमीप्रमाणं बºयाच नातेवाईकांनाही ट्रीपसाठी विचारण्यात आलं. त्यांनीही नेहमीप्रमाणे सुरुवातीला उत्साह दाखवला आणि नंतर तो ओसरतही गेला. सगळे गळून गेल्यावर शेवटी राहिलो आम्ही तिघी-चौघीच ! आई, मावशी, ताई आणि मी! पण मग ‘‘चौघीच कसं जाणार ना कुठं? कोणीतरी पुरुष सोबत हवाच ना!’’ हा टिपिकल सूर सगळ्यांनीच आळवला. पण खरंच चौघींचं जाणं इतकं कठीण आहे का, असा प्रश्न मी आधी माझ्या मनाला विचारला आणि जेव्हा मनानं हसत उत्तर दिलं ‘अजिबात नाही’ तेव्हा मग हाच प्रश्न मी या तिघींना विचारला. खरं तर उत्तराची अपेक्षा नव्हतीच त्यांच्याकडून! मीच माझं म्हणणं समोर ठेवलं अन् त्यांना तयार केलं. ठिकाण ठरलं. ‘अमृतसर, चंदीगढ आणि सिमला!’ तेही विमानानं जाणं आणि विमानानंच येणं! उत्सुकता आणि उत्साह चांगलाच वाढला, पण तरीही निघेपर्यंत प्रत्येकाच्या मनात धडधड! विमानाची तिकिटं बुक झाली, हॉटेल्सचंही बुकिंग झालं. सगळं ठरलं. निघायचा दिवस उजाडला. निघायच्या काही तास आधी मामा आला. त्यालाही आमची काळजी होतीच! ‘‘कसं तुम्ही चौघीच जाणार की काय की! जपून राहा! माणसं चांगली नसतात’’, असा काळजीपूर्वक सल्ला दिला त्याने. त्याला फक्त इतकंच म्हटलं की, ‘‘माणसं चांगली असतात आणि चांगली माणसं भेटतातही.’’
फायनली प्रवासाला सुरुवात झाली. इथून मुंबई, मुंबई ते एअरपोर्ट इथपर्यंत ठीक होतं. पण पहिल्यांदाच विमानानं प्रवास करणाºया आम्ही चौघी, त्यामुळे विमानात बसेपर्यंत टेन्शन. पण तिथे चेहºयावर निरंतर स्मितहास्य सांभाळणाºया सुंदरींना (एअर होस्टेस) आमचं नवखेपण सवयीनं जाणलं आणि योग्य ते मार्गदर्शन केलं. तिकडच्या सगळ्या गोष्टीतून पार होत होत ‘गुड इव्हिनिंग’ म्हणणाºया हवाई सुंदरीनं आमचं स्वागत केलं आणि आम्हीही चला एकदाचे विमानात आलोच्या तिच्या दुप्पट स्माईल देऊन तिला गुड इव्हिनिंग म्हटलं आणि आत प्रवेश केला. सुदैवानं एक खिडकीची जागा मिळाली. अडीच तासाच्या फ्लाईटमध्ये आळीपाळीने खिडकीत बसून आम्ही हवेत तरंगण्याचा सुखद अनुभव घेतला आणि सात वाजेपर्यंत अमृतसरला पोहोचलो. तिकडेही सुवर्ण मंदिराच्या परिसरात राहण्याची सोय व्यवस्थित होती. गुरुद्वारा, जालीयनवाला बाग आणि मग वाघा बॉर्डरचा विलक्षण अनुभव घेऊन ट्रेनने आम्ही गुरुद्वारातील माझ्यातला मीपणा संपवणाºया त्या सेवाभावापुढे मात्र प्रत्येक जण नतमस्तकच होतो. पुढे चंदीगढ, सिमला, तिथली सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहिली.
या प्रवासात हरप्रीतसिंग अर्थात ‘हॅरी’ नावाचे पाजी आमच्यासोबत होते. त्यांच्याच कारमधून आमचा हा सगळा प्रवास होता. आवड म्हणून पर्यटकांना असं फिरवणारे पाजी अगदी आमच्याच कुटुंबातले वाटले. आपुलकीने प्रत्येकाची काळजी घेणारे, आमची गैरसोय होऊ नये, यासाठी धडपडणारे आणि पंजाबी भाषेत अधूनमधून हिंदी पेरत मनातलं सगळं शेअर करत राहणारे पाजी आई-मावशीसाठी बेटा झाले तर ताई आणि माझ्यासाठी भैय्या! एक नवं नातं गवसलं आम्हाला. खूप मज्जा केली आम्ही.
मग सुरू झाला परतीचा प्रवास. तेव्हा जाणवलं की, आता कुठे प्रवासातला आनंद जाणवतोय. होतं असं की, गाव सोडलं तरी सुटत नाही. थोडं-थोडं ते सुटायला लागतं. आपण प्रवासात रमायला लागतो तेव्हा पुन्हा घर गाठण्याची वेळ जवळ यायला लागते. आम्ही परतीच्या विमानात बसलो. वेगळा अनुभव घेऊन आम्ही सोलापूरला पोहोचलो. त्याचबरोबर होता एक नवा आत्मविश्वास! की आपण सगळं नीट मॅनेज करू शकतो. आल्यावर मामानं विचारलं ‘मग सगळं नीट झालं ना?’ तितक्यात हॅरी पाजींचा मेसेज आला ‘सिस्टर सब अच्छेसे पहुँच गए ना?’ मी त्यांना ‘हाँ भैय्याजी’ असा मेसेज केला आणि मामाला म्हटलं ‘‘सगळं भारी झालं... माणसं चांगली असतात आणि चांगली माणसं भेटतातही !- ममता बोल्ली(लेखिका कवयित्री अन् साहित्यिक आहेत.)