बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : लॉकडाऊनने अनेकांचे जगणे मुश्कील केले आहे. श्रमिकांची रोजीरोटी अर्थात दिवसाची मजुरी रोजच बुडत असल्याने कर्ज काढण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिना. त्यामुळे पोटासाठी श्रमिकांची तगमग आणि धावपळ सुरू आहे. खाजगी सावकारांच्या घरासमोर श्रमिकांची रोजच गर्दी दिसतेय. श्रमिकांची गरज ओळखून खाजगी सावकारांकडून श्रमिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. सकाळी गेलेल्या गरजूला दुपारी बोलावतात. दुपारी गेल्यानंतर संध्याकाळी या म्हणतात. बराच वेळ ताटकळत ठेवल्यानंतर रात्री उशिरा गरजूंना पंचवीस ते तीस टक्के व्याजाने कर्ज देतात.
गत्यंतर नसल्याने श्रमिकदेखील ज्यादा व्याजदराने कर्ज स्वीकारतायत. खाजगी सावकारांचा हा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. कर्ज देताना दम देतायत. नियोजित वेळेत नियमित व्याज न भरल्यास व्याजावरदेखील व्याज लावू, असा दम भरतायत. थकीत व्याजावर व्याज देण्यास कर्जदार तयार झाल्यानंतरच कर्जे देतायत. विशेषकरून पूर्व भागात खासगी सावकारांची मोठी रेलचेल वाढली असून, श्रमिकांना अवाच्या सव्वा व्याजाने कर्ज मोठ्या प्रमाणात देत आहेत. जुना विडी घरकुल, नवीन विडी घरकुल, अशोक चौक, नीलमनगर, स्वागतनगर, ७० फूट रोड, माधवनगर, दत्तनगर, घोंगडे वस्ती, कन्नाचौक, राजेंद्र चौक, गवई पेठ, गवळी वस्ती, एमआयडीसी परिसरात खाजगी सावकारांच्या सुळसुळाट वाढला आहे. विडी, यंत्रमाग, रेडिमेड, बांधकाम, तसेच घरेलू कामगार मोठ्या प्रमाणात सावकारांकडून कर्ज घेत आहेत
घर विकायला काढलं
सलग एक वर्ष झालं. घरातील पुरुष मंडळींचा रोजगार पूर्णपणे थांबला आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमुळं घराची आर्थिक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, राहतं घर विकायला काढलं आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळं घर घ्यायला कोणी पुढं येईना. त्यामुळं खाजगी सावकाराकडून पंचवीस टक्के व्याजानं कर्ज घेतलं आहे. घराची विक्री झाल्यावर सावकाराचं कर्ज फेडू.
-सत्यम्मा गोने, विडी कामगार
सावकारांविरोधात तक्रार करणार
पूर्वभागातील सामाजिक कार्यकर्ते मोहन तलकोकुल सांगतात, श्रमिक कामगारांची रोज उपासमार सुरू असल्याने त्यांना पैशांची नितांत गरज आहे. कोणी हजार रुपयाचे कर्ज काढतोय, तर कोणी दहा हजारांचे कर्ज काढतोय, अनेक गरीब लोक आमच्याकडे कर्ज मिळवून द्या, अशी मागणी करतायत. आम्ही त्यांना कर्ज मिळवून देण्यात मदत करत नाही. त्यांना दोन वेळचे जेवण देतो. दानशूर व्यक्तींकडून तयार अन्न किंवा धान्य घेऊन गरजूंच्या घरी पोहोच करत आहोत. पूर्व भागातील सावकारांची दादागिरी थांबली पाहिजे. त्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून ज्यादा व्याज घेऊ नयेत. लॉकडाऊन संपल्यानंतर खाजगी सावकारांविरोधात जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे तक्रार करणार आहोत.