सोलापूर : हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका विवाहित सिस्टरची दररोजच्या प्रवासात एसटी चालकाबरोबर ओळख झाली. ओळखीतून त्याने लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन अनेकदा अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला. यारोबरच तिच्या अंगावरील दागिने पळवून नेल्याप्रकरणी त्या एसटी चालकाविरुद्ध बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट २०२२ ते ५ ऑगस्ट २०२३ दरम्यान हा प्रकार घडला असून बार्शी शहर पोलिसांनी विकास पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, पीडित महिलेचा पहिला विवाह झालेला असून ती एका खासगी रुग्णालयात सिस्टर म्हणून काम करते तर आरोपी हा एसटी चालक आहे. ती रोज एसटी प्रवास करून रुग्णालयात जात होती.
यातून चालकासोबत ओळख झाली. त्याने तिला तू खूप आवडतेस, तुझ्याबरोबर लग्न करतो म्हणाला. यावर पीडितेने पहिला विवाह झाला असून मुले असल्याचे स्पष्ट केले. त्याने इन्स्टाग्रामवर ओळख वाढवली. यावर त्याने नवऱ्याशी घटस्फोट घे म्हणत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पंढरपूर येथील एका लॉजवर लग्नाची बोलणी करण्यासाठी घेऊन गेला. तेथे त्याने अत्याचार केला.
पाच महिन्यांपूर्वी ही माहिती तिच्या पतीस समजताच तो भांडू लागला. ती दीड महिन्यापूर्वी बार्शीत माहेरी रहायला आली. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी विकास पाटील हा भेटायला येऊन तिला तेथील दोन वेगळ्या लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यावेळी दोघात वाद झाला. लग्नाबाबत विचारताच तो उडवाउडवी करू लागला. पीडिता ही अंगावरील दोन ग्रॅम मणी मंगळसूत्र, चार ग्रॅम कर्णफुले व चांदीचे पैंजण काढून पर्समध्ये ठेवून झोपली असता त्याने पाच ऑगस्ट रोजी काढून घेऊन गायब केले. हा प्रकार लक्षात येताच तिने फोन करून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाइल लागला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत .