अहमदाबाद हवाई प्रवास करून मी घरी परतत होतो. सुरक्षारक्षक चारही दिशेला दिसत होते. हाय अलर्टवर असताना कामाचा ताण त्याच्यावर दिसत होता. तेवढ्यात एक सुरक्षारक्षक एका प्रवाशावर ओरडला. कामाचा प्रचंड त्रास त्यातून दिसून येत होता. परंतु पुन्हा स्वत:ला सावरत त्या सैनिकाने प्रवाशाची माफी मागत स्मितहास्य केले. ते पाहून मन गहिवरले. एवढ्या तणावात त्या सैनिकाने परिस्थिती सांभाळली.
असे अनेक प्रसंग आहेत ज्या ठिकाणी भारतीय सैनिक परिस्थिती हाताळताना दिसतो. कोल्हापूर, सांगली, उर्वरित महाराष्टÑ जेव्हा पाण्यात होता, महापुराने सर्वांना संकटात टाकलेले असताना भारतीय सेनेचे जवान मदतीस धावून आले. जीवाची पर्वा न करता अनेक लोकांचे प्राण वाचवले. अशा भारतीय सेनेला मानाचा मुजरा! देशात कोठेही आपत्ती असो वा देशाचे रक्षण करण्याची वेळ येऊ दे, भारतीय सेना तत्पर असते. सर्वतोपरी प्रयत्न करून भारतीय नागरिकांना नव्हे तर माणुसकीला अभिमान वाटेल असे कार्य या सेनेकडून होत आहे.
लोकांना माणुसकीच्या नात्याने वाचवताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक सैनिकसुद्धा माणूसच आहे आणि त्याने आपली बायका-पोरं, घरदार सोडून फक्त देशासाठी एवढ्या कठीण परिस्थितीत उडी मारली आहे. प्रत्येक सैनिक भावनिकदृष्ट्या आपल्या कुटुंबीयांना गावात, नातलगात सोडून देशाचे रक्षण करत आहे आणि वाईट परिस्थितीत जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवत आहे. स्वत:च्या काळजावर दगड ठेवत तो माणुसकीसाठी झटत आहे, हे विसरून चालणार नाही.
नदी, जंगल, पर्वत सर्व त्यांच्या ओळखीचे आहेत. असे महापूर, भूकंप, प्रलय, इतर कोणत्याही संकटात मदतीचा हात सैनिकांचाच आहे. मातृभूमीचे प्रेम, माणुसकी या नात्याने कठीण परिस्थितीत सुद्धा देशाचे रक्षण करणारा सैनिक प्राणाची बाजी लावतो. लक्षात असू द्या की, प्रत्येक सैनिक पिता, पती, मुलगा, भाऊ आणि मित्रसुद्धा आहे. छातीवर गोळ्या झेलणाºया या वीरांना सुद्धा डोळे मिटताना घरचे आठवतात. आपले स्वत:चे हाल होत असताना, अपंगत्व येऊनही प्राणाची पर्वा न करता लढणाºया या जवानांना मानाचे सॅल्युट केले आहे.
देशाचे रक्षण करणारे सैनिक अहोरात्र देशसेवा करतात. ऊन, पाऊस, वारा, जंगल, दºया-खोरे, पर्वत या सर्व जागी, बिकट प्रसंगी देशप्रेम मनात धरून रक्षण करणारे हे वीर तुझे हजार सलाम!
आज जगून घेतो, उद्याचे काही सांगता येत नाही. अशी जाणीव असणारा सैनिक गाणी गात, नृत्य करत आपल्या साथीदारांबरोबर मनोरंजन करून घेतो. उदार अंत:करणाने मानव जातीसाठी उभा असणारा सैनिक कधी कधी भावुक होतो हे मी पाहिले आहे.भारतीय सैनिक गंभीर परिस्थिती हाताळतो, त्यासाठी त्याला तयार केले जाते. परंतु असाधारण परिस्थिती जी की हाताबाहेर आहे त्यातसुद्धा आपले कर्तव्य बजावत असतो. ना अपेक्षा ना गरज, परंतु आपण भारतीय असे काम केले पाहिजे की, सैनिकाससुद्धा लढण्यास अभिमान वाटला पाहिजे. नागरिक म्हणून आपण देशात व परदेशात असे काहीही काम करू नये ज्यामुळे देशाचे नाव खाली जाईल.
सैनिकहो तुम्ही लढता, वाचवता आणि वेळ पडल्यास लक्ष्यासाठी घरात घुसूनही मारता. तुमच्या या बहादुरीला भारतमाता व भारतीय जनता कधीच विसरू शकत नाही.
अशाच या सैन्यदलाला हजार सलाम! जात, धर्म, प्रांत, राज्य, वेळ, काळ यांचा विचार न करता अखंड मानवजातीला लाभ होईल, असे कृत्य सैनिक करत राहतो आणि पुढेही करत राहणार यावर पूर्ण विश्वास आहे. लोकांचे प्रेम हीच अपेक्षा ठेवून दिवाळी, दसरा, ईद, सणवार न पाहता सीमेचे रक्षण करणाºया या सैनिकास एक चांगले नागरिक बनून दाखविण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.
सैनिक आणि जबाबदार नागरिक मिळून संकटास तोंड देऊ आणि एक उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यास मदत करू, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!- ऋत्विज चव्हाण(लेखक हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)