सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास शेतकºयांच्या सहभागामुळे मोठा प्रतिसाद मिळाल्याने दूध संकलनावर परिणाम झाला. सोलापूर जिल्ह्यात खासगी संस्था व सहकारी संघाचे दररोज सकाळी ७ ते ८ लाख लिटर संकलन होत असताना अवघे ११ हजार लिटर संकलन झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. जिल्ह्याचे खासगी व सहकारी संघाचे दोन वेळचे संकलन १२ लाख लिटर इतके आहे.
प्रतिलिटर पाच रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे किंवा दूध संकलन करणाºया संस्थांनी दूध खरेदी दर पाच रुपयाने वाढवावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार दिनांक १६ जुलैपासून दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी खासगी जवळपास सर्वच संस्थांनी दूध संकलन बंद ठेवले होते. अगोदर दुधाला दर परवडणारा नसल्याने शेतकºयांची नाराजी असल्याने शेतकरीही दूध घालण्यास नाखूश असताना आंदोलकांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी संकलनासाठी सुट्ट्याच घेण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे दररोजचे (दोन वेळचे) संकलन एक लाख ४८ हजार लिटर असून सकाळी ७० ते ७४ हजार लिटर दूध संकलन असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा संघाचे सोमवारी सकाळी ११ हजार लिटर दूध संकलन झाले होते. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील डॉक लगतच्या शेतकºयांनी स्वत:हून हे दूध पोहोच केल्याचे सांगण्यात आले. सहकारी संघाला दररोज जवळपास दोन लाख व खासगी संघाकडे दररोज संकलन होणारे १० लाख लिटर असे १२ लाख लिटर दूध संकलन होत असल्याचे जिल्हा दूध विकास कार्यालयातून सांगण्यात आले. शहरालगतच्या गावातील गवळ्यांनी मात्र नेहमीप्रमाणे रतिबाचे दूध पोहोच केल्याचे दिसून आले.
शेतकºयांचाच सहभाग...- मागील वर्षभरापासून दुधाचा दर वाढवून मिळण्याऐवजी दर काही महिन्याच्या अंतराने दर कमी केला जात आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी वैतागला आहे. तोट्यातील दूध धंदा बंदही करता येईना व दूध घेणाºया खासगी व सहकारी संस्था दर वाढवूनही देत नसल्याने शेतकरी शासनावर नाराज आहेत. दूध दर परवडणारे नसल्याने नाराज असलेले शेतकरी स्वत:हून दूध बंद आंदोलनात सहभागी झाले असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसत आहे.