सोलापूर : अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर सहकारी दूध संघाने (दूध पंढरी) पहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे पॅकिंग दूध विक्री प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पॅकबंद दही प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी दिली.सोलापूरसह राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. जगातील बाजारपेठेत दूध पावडरीचे दर कोसळल्याने राज्यातील पावडर प्रकल्प बंद पडले आहेत. पावडरीसाठी वापरले जाणारे दूध बाजारात विक्रीसाठी आल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला आहे. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत दूध वाढीचा कालावधी असतो त्यातच पावडरीसाठीचे दूध बाजारात आल्याने उदंड झाले दूध अशी स्थिती झाली आहे.
यामुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने पॅकिंग पिशवीतून दूध विक्री करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद व अमरावती येथे भाडेतत्त्वावर प्लॉन्ट घेऊन तेथून ‘पॅकिंग’पिशवीतून दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे हे प्रकल्प १५ दिवसात सुरू करण्याची तयारी केली आहे. किमान एक एप्रिलपासून या शहरात दूध पंढरीचे दूध पॅकिंग पिशवीतून विक्री सुरू होईल असे व्यवस्थापकीय संचालक मुळे यांनी सांगितले. त्यानंतर हैदराबाद, अमरावती व अन्य ठिकाणीही पॅकिंग पिशवी दूध विक्री प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.
दूध संघाने केगाव येथील प्रकल्पातून दही तयार करण्यास सुरूवात केली असून सध्या दररोज ५०० ते ७०० लिटर दही तयार करुन त्याची शहरातच विक्री केली जात असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.हक्काचे मार्केट तयार होईल: परिचारक- वैभववाडी येथे टँकरने दूध नेऊन तेथे पॅकिंग करुन गोव्याला सध्या १० हजार लिटर दूध विक्री केली जात असून कोकणातही पॅकिंग दुधाची विक्री सुरू होणार असल्याचे दूध पंढरीचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. केगावला बाटली बंद दूध प्रकल्पाचे(निर्जंतुक सुगंधी दूध) काम सुरू असून दीड-दोन महिन्यात ते बाजारात विक्रीसाठी येईल. हे दूध तयार झाल्यापासून किमान चार महिने टिकेल, हक्काचे मार्केट तयार केले तरच बाजारात टिकाव लागेल असे आ. परिचारक म्हणाले.