सोलापूर: ३.५ फॅट असलेल्या गाईच्या दुधाला एक आॅगस्टपासून प्रति लिटर २५ रुपयांचा दर देण्यावर खासगी व सहकारी संघांनी शिक्कामोर्तब केले आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ३.५ पेक्षा कमी फॅट असलेले दूधही स्वीकारले जाणार असून, त्यालाही शासन प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान देणार आहे.
राज्यात गाईच्या दुधाचे दर १५ रुपयांवर आल्याने दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूधबंद आंदोलन केले होते. त्यानंतर नागपूर येथे विधानसभेचे सभापती, मुख्यमंत्री व विविध पक्षांच्या नेत्यांच्या १९ जुलैच्या बैठकीत गाईच्या दुधाला २५ रुपये दर द्यावा व पाच रुपये अनुदान शासनाने द्यावे, असा निर्णय झाला होता. मात्र ३.५ फॅट असलेल्या दुधालाच ५ रुपयांचे अनुदान मिळणार होते. राज्यात बहुतांशी दूध हे त्यापेक्षा कमी फॅटचे असल्याने या अटीमुळे शेतकºयांचे नुकसान होणार असल्याची बाब दूध संघांच्या पदाधिकाºयांनी लक्षात आणून दिली होती.
त्यानंतर दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी २४ जुलै रोजी घेतलेल्या बैठकीत दरवाढीवर झालेल्या चर्चेनंतर ३१ जुलै रोजी शासनाने फेरआदेश काढला. हा आदेश खासगी व सहकारी संघांनी मान्य केला असून, एक आॅगस्टपासून दरवाढ देणार असल्याचे सांगितले आहे. पिशवीबंद दुधास व दुग्धजन्य पदार्थांसाठी वापरल्या जाणाºया दुधाला अनुदान मिळणार नाही. राज्यात शिल्लक असलेल्या ३० हजार १८३ मे.टन.पैकी निर्मिती होणाºया पावडरसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाºया संस्थेने दूध खरेदी देयकाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे बंधनकारक आहे.
असा मिळेल दर...
- - ३.२ फॅट असलेल्या दुधाला शासनाचे अनुदान ५ रुपये व संस्थेने १९ रुपये १० पैसे असे २४ रुपये १० पैसे.
- - ३.३ फॅटच्या दुधाला ५ रुपये अनुदान व संस्थेचे १९ रुपये ४० पैसे असे एकूण २४ रुपये ४० पैसे.
- -३.४ फॅट असलेल्या दुधाला पाच रुपये शासन अनुदान व संस्थेचे १९ रु. ७० पैसे असे एकूण २४ रुपये ७० पैसे.
- - ३.५ फॅट असलेल्या दुधाला पाच रुपये अनुदान व २० रुपये संस्था असे २५ रुपये.
सहकारी व खासगी संघांना हा दर देणे बंधनकारक आहे. हा दर न देणाºयांवर शासनाने कारवाई करावी. खा. राजू शेट्टी यांच्यामुळे शेतकºयांना न्याय मिळाला.- विनायकराव पाटील,अध्यक्ष, राज्य दूध उत्पादक कृती समिती
बळीराजाला न्याय देणाºया शासनाचे आभार. विक्रेत्याचे कमिशन कमी व स्कीम बंद करुन दरवाढीची अंमलबजावणी करावी. शासनाने वेळेवर अनुदान द्यावे.- दशरथ माने,अध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर
आजपासूनच आम्ही दरवाढीची अंमलबजावणी करणार आहोत. शेतकºयांसाठी चांगला निर्णय घेणाºया मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाºयांचे अभिनंदन.- आ. प्रशांत परिचारक,अध्यक्ष, सोलापूर जिल्हा दूध संघ