सोलापूर : सहकारी व खासगी दूध संघांनी गाईच्या दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे मागील महिन्यात कसाबसा लिटरला २० मिळणारा दरही आता १८ रुपयांवर आला आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर तर राज्य शासनाने दूध उत्पादकांना वाºयावर सोडल्याचे दिसत आहे.
राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दूध संकलन होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
राज्यात दररोज गाईचे दूध एक कोटी १० लाख लिटरच्या दरम्यान संकलन होते. यामध्ये या सहा जिल्ह्यातील ८० ते ९० लाख लिटर दूध असते. या जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनावरे सांभाळून कुटुंबाची उपजीविका करणारे शेतकरी आता अडचणीत आले आहेत. कारण गेल्या चार महिन्यांपासून दुधाला दर मिळत नाही. कोरोनाची संचारबंदी उठल्यानंतर व्यवहार सुरळीत चालल्यानंतर तरी शेतीमाल व दुधाला दरवाढ मिळेल या अपेक्षेवर शेतकरी बसले होते; मात्र काल-परवा खासगी व सहकारी दूध संघांनी काढलेल्या दरपत्रांनी शेतकºयांना घाम फुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रात इंदापूर येथील सोनाई हा खासगी संघ सर्वाधिक दूध संकलन करणारा संघ आहे.
या सोनाई संघाने ७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या दरपत्रकात ३.५/८.५ प्रकारच्या दुधाला वाहतूक व कमिशनसह प्रतिलिटरला १९ रुपये ५० पैसे दर देणार असल्याचे म्हटले आहे. तर ३.५/८.४ प्रकारच्या दुधाला १९ रुपये २० पैसे दर जाहीर केला आहे. म्हणजे शेतकºयांना एका लिटरला १७ रुपये किंवा १७ रुपये ५० पैसे मिळणार आहेत.
गोविंद मिल्कने थेट ३.५/८.५ प्रकारच्या दुधाला प्रतिलिटरला १८ रुपये मिळतील असे जाहीर केले आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ३.५/८.५ प्रतिच्या दुधाला १९ रुपये व ३.५ / ८.५ प्रतिच्या दुधाला १८ रुपये ७० पैसे दर जाहीर केला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धोरण विचारण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पोहोच दुधाला २०.५० पैसे दरसोनाई दूध उत्पादक संघाने सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला मेल पाठवून टँकरद्वारे पोहोच केलेल्या दुधाला प्रतिलिटर २० रुपये ५० पैसे असा दर मिळेल असे कळविले आहे. संघाला संकलन व वाहतुकीसाठी एक ते दीड रुपये खर्च येतो. सोलापूर जिल्हा दूध संघाचे सध्या ५० ते ५५ हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. या दुधाचे काय करायचे?, हा दूध पंढरीसमोर प्रश्न असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
सरकार मदत करीत नाही. अन्य दूध व दुग्धजन्य पदार्थ विकत नाहीत. दूध व्यवसाय जाम झाला आहे. दर कमी केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने अनुदान दिले तरच दूध घेणे परवडणार आहे. राज्यातील सर्वच दूध उत्पादक संघांनी खरेदी दर कमी केले आहेत.- दशरथ मानेसोनाई दूध संघ, इंदापूर
आमच्या सरकारने दूध दर कमी झाल्यानंतर सर्वच दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊन शेतकºयांना मदत केली होती. या सरकारने सुरू केलेल्या अनुदान योजनेचा फायदा केवळ मंत्री व त्यांच्या नातलगांना झाला. ती योजनाही बंद झाली.- सदाभाऊ खोत माजी मंत्री