सोलापूर - दूर दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची दरवाढ देण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी राज्यभरात एल्गार पुकारला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पहिल्या दिवशी दूध पुरवठ्यावर परिणाम झाला नसला तरी दुसऱ्या दिवशी तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
यावर, दुधाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी इतर राज्यांमधून विशेषतः गुजरात आणि कर्नाटकमधून दूध पुरवठ्याची सोय करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र याविरोधात आपण सत्याग्रहाला सुरुवात करू आणि अन्य राज्यांमधून दूध आणले जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे. शिवाय, सरकार आमच्या आंदोलनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.
मुंबईचा पुरवठा वाढवलादूध संघाने दोन दिवस आधीच दुधाचा मुंबईला होणारा पुरवठा वाढवून किमान दोन दिवस येथे दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे.
'पोलीस बंदोबस्तात मुंबईला दूधपुरवठा'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबईचा दूधपुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलन छेडले असताना दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला कोणत्याही परिस्थितीत दूध कमी पडू दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात मुंबईला दूधपुरवठा करण्यात येईल, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही जानकर यांनी दिला आहे.