ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ६ - रमजानच्या शिरखुर्म्यासाठी जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाने साडेचार लाख लिटर दूध विक्रीची व्यवस्था केली आहे. शहर आणि जिल्ह्यात प्रमुख केंद्रांवर सुटे दूध देण्यासाठी टँकर असतील, शिवाय ३०० अधिकृत एजंटमार्फतही दूध विक्रीचे नियोजन पूर्ण झाले आहे. बुधवारीच रमजान ईद होईल, या अपेक्षेने संघाने सर्व तयारी करून ठेवली होती. आता गुरुवारी ईद असल्याने त्याच दिवशी पहाटेपासून दुधाची विक्री होईल, असे संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी कळवले.
रमजानसाठी खास उच्च प्रतीचे दूध संकलन करण्यात आले. वितरक आणि खास विक्री केंद्रे सुरू करून त्याचे वितरण करण्याचे नियोजन आहे. शहर आणि जिल्ह्याशिवाय विजापूर, इंडी, सिंदगी, गाणगापूर, अफजलपूर, उमरगा, बसवकल्याण, लातूर, तुळजापूर आदी ठिकाणीही विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा आणि करमाळा येथे विक्री केंद्रे असतील.
शहरातील विक्री केंद्रे :
नईजिंदगी, समाचार चौक, जिंदाशहा मदार चौक, अशोक चौक, सादिक क्लब, सोशल हायस्कूल, कुर्बानहुसेन नगर (मोहमदिया मशीद), मौलाली चौक, शासकीय विश्रामगृह, बाराइमाम चौक, शास्त्रीनगर, सिव्हिल लाइन्स, जोडबसवण्णा चौक, अक्कलकोट नाका, कल्पना चित्रपटगृह येथे दुधाचे टँकर असतील.
मनपाला आज सुटी,तयारीचे आव्हान
ईदच्या नमाजसाठी तयारीचे महापालिकेसमोर आव्हान आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. ईद दिवशी पाऊस झाल्यास सर्व ईदगाह मैदानावर पाणी साचून चिखल होण्याची शक्यता आहे. होटगी रोडवरील ईदगाह मैदानावर उतार असल्याने पाणी साचण्याची भीती आहे. मैदानावर चिखल झाल्यास नमाज अदा करणे अवघड होईल, त्यामुळे मनपाने उपाय योजना आखणे गरजेचे आहे.