वासरू, श्वानावर हल्ला करून केले ठार
अंजनडोह येथील दुर्घटनेनंतर रविवारी दुपारी बिबट्या देवळाली, झरे, उमरड येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मांजरगाव येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार मारले तर मोरवड येथे कुत्र्यावर हल्ला करून ठार मारले आहे. शिवाय मांगी, पोथरे, कोळगाव या भागातही बिबट्याला पाहिल्याचे अनेकांनी सांगितले.
आठ ठिकाणी लावले पिंजरे, १०० अधिकारी, कर्मचारी तैनात
फुंदेवाडी येथे झालेल्या घटनेनंतर सोलापूर, अहमदनगर, बीड येथून वनविभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी करमाळा तालुक्यात त्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी दाखल झालेले आहेत. रावगाव, मोरवड, शेगुड, अंजनडोह, विहाळ, पोंधवडी, उमरड, मांजरगाव या ८ ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहेत. वनरक्षक अधिकाऱ्यांचा फौजफाटा बिबट्याच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत परिसरात शोधकार्य करीत आहे, पण अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही.
लोकप्रतिनिधीनी घेतली बैठक
तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने दोघांचा बळी गेल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. या पार्श्वभूमीवर आ. संजयमामा शिंदे यांनी बिबट्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी महसूल, पोलीस, वनविभाग यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर अंजनडोह येथील घटनास्थळी भेट देऊन शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले; मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे अद्याप घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत. त्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.