शनिवार रात्री व रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत सांगोला तालुक्यात ९ मंडळनिहाय १०५, तर सरासरी ११.६६ मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण आहे.
सांगोला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पर्जन्यमानात वाढ झाल्यामुळे खरीप हंगामाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून तालुक्यातील ३१,५०४ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका आदी पिकांच्या पेरणीचा अंदाज वर्तविला आहे.
चालू वर्षी मान्सूनपूर्व (रोहिणी) व मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी वापसा येताच खरीप बाजरी, मका, तूर, उडीद, मटकी, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांच्या पेरणीसाठी सुरुवात केली होती. आतापर्यंत झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी बाजरी, मका आदी पिकांची सुमारे ४,२१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकून घेतली आहे. पेरणी झालेल्या पिकांची उगवणही चांगल्या प्रकारे झाली आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे २७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या होत्या, तर पेरणी झालेल्या पिकांना वेळेत पाऊस झाला नसता तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे दमदार पावसासाठी आकाशाकडे लागले होते.
मंडळनिहाय पाऊस
सांगोला तालुक्यात शनिवारी रात्रभर झालेल्या पावसाची सांगोला ६, हातीद २, नाझरे ४, महूद ७, संगेवाडी २७, सोनंद ११, जवळा २, कोळा २७, शिवणे ३, असा नऊ मंडळांमध्ये एकूण १०५ मि.मी., तर सरासरी ११.६६ मि.मी. पाऊस झाला.