भीमानगर : दुष्काळाची दाहकता आता वाढत चाललेली दिसायला लागली आहे. कधी नव्हे ते उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाºया भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्रात असलेले असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर काही मासे हे पात्रातील छोट्याशा डबक्यांमध्ये अखेरच्या घटका मोजत आहेत.
माढा तालुक्यातील रांझणी, आलेगाव बुद्रुक, परिसरातील उन्हाळ्याच्या तीव्रतेने भीमा नदीचे पात्र कोरडे ठाक झाल्याने येथील लक्षावधी मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. याच परिसरातील अवसरी, बाभूळगाव, बेडसिंगे, भांडगाव या गावातील उभ्या पिकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून या जलचराना व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वीही उजनीतून पाणी सोडावे अशी मागणी करत शेतकºयांनी आंदोलन केले होते; मात्र याचा कसलाच परिणाम यंत्रणेवर झाला नाही.
तीव्र उन्हामुळे नदीपात्रातील पाणी आटले आहे. लाखो जलचर चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. असंख्य चिखलात अखेरच्या घटका मोजत आहेत. या जलचरांच्या मरतुकीबरोबरच पिकेही वाळून चालल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
ही भयावह वास्तवाची चाहूलच !- पात्रात मृतावस्थेत सड्यासारखे पडून असलेले मासे खाण्यासाठी या भागात पक्षांनीही गर्दी केली आहे. अल्पश्रमात असंख्य मासे सापडत असल्याने मासेमारही गर्दी करीत आहेत. हे दुष्काळाचे चित्र भयावह असून भविष्यात जनावरे आणि पिके पाण्याविना हळूहळू जळत जाणार हे भयंकर वास्तव आहे. मागील कित्येक दिवसात अशी परिस्थिती प्रथमच पाहावयास मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. आगामी काळातील भयावह वास्तवाची ही चाहूलच आहे की काय, या भीतीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.