माढ्याच्या ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ७३८ जागेसाठी अपक्ष, गावच्या विविध पक्षातून, पूरक नामनिर्देशन अर्जाद्वारे तब्बल २३५२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यातून १० अर्ज हे छाननीत नामंजूर झाले. त्यामुळे गावपुढारी इच्छुकांना विविध प्रकारची आश्वासने देऊ लागले आहेत. मात्र अनेक गावातील अपक्ष व पूरक इच्छुक उमेदवारांतून या गोष्टीला विरोध होऊ लागला आहे. आम्ही त्या जागेवर लढणारच अशी त्यांनी भूमिका घेतल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच या गोंधळात नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या दोन दिवसांच्या मुदतीतला शुक्रवारचा दिवस तर गेला, आता फक्त सोमवारचा एकच दिवस उरल्याने गावपुढारी मात्र चांगलेच तणावात आहेत.
माढ्यात प्रत्येक गावांत या निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे अगोदरच राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. तालुक्यात नामनिर्देशन अर्ज हे एकूण जागेपेक्षा तिप्पटीने आल्याने हा गोंधळ उडाला आहे. अनेक गावातील होतकरू तरुण, सुशिक्षित व उच्च शिक्षितांनी यामध्ये सहभाग घेतल्याने पॅनलप्रमुख असणाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. काही गावात तर उच्च शिक्षित इच्छुक उमेदवारांना मनधरणी करण्यासाठी गावपुढारी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहेत. तरुण वर्ग त्यांना भूलथापांना बळी पडत नसल्याचे दिसून येत आहे. यंदा माढा तालुक्यातील अनेक गावांतून तरुण व उच्च शिक्षित इच्छुकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत रस दाखवलेला आहे.
अनेक ग्रामपंचायतींची बिनविरोधकडे वाटचाल
यंदा ८२ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतून निमगाव (टे), वाकाव, जामगाव, सापटणे(भो), महातपूर, वडाचीवाडी (त.म) या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात जमा आहेत. त्यांची घोषणा करणे फक्त बाकी आहे. आणखी काही ग्रामपंचायती या बिनविरोधाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पण सोमवारीच तेथील अर्ज माघारी घेतल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. त्यासाठी तेथील नेते बैठका घेत आहेत.