Jaykumar Gore: एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना कडाडून इशारा दिला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यानंतर सोलापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही, असं जयकुमार गोरे म्हणाले.
शनिवारी रात्री माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. नुकतीच जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत तुफान फटकेबाजी केली. देवाभाऊ माझ्या पाठीशी असल्याचेही जयकुमार गोरे म्हणाले.
"अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालतंय, काळ्या बाहुल्या रोवतंय. एक साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झालं. एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्यावर केस झाली नाही. आम्हाला सवय आहे. माझ्या मतदारसंघातली लोक केसकडे बघत पण नाही. पण निवडणूक आली आणि जयकुमार गोरेवर केस दाखल झाली नाही असं कधीच झालं नाही. पण मी कधी थांबलो नाही. कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहेत तोपर्यंत जयकुमार गोरेचं कोणीही काही वाकड करू शकणार नाही," असं जयकुमार गोरे म्हणाले.
"कुणाचंही वाईट करून कधीच कोणाचे चांगलं होत नाही. जो वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही. तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधीही हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय थोडीशी वाट बघा. आज काही जास्तीच बोलणार नाही. माझ्याकडे सगळेच आहे. जे काही करायचं आहे ते सगळं माझ्याच खात्याकडे आहे," असंही जयकुमार गोरे म्हणाले.
"राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा असणारा माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठ्या जन्माला आला आहे. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. माण-खटाव तालुका आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या ३२ दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल हे लक्षात ठेवा," अस जयकुमार गोरेंनी म्हटलं.