Solapur BJP MLA: "भाजपचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात," अशी खंत भाजपचे सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासमोर जाहीरपणे व्यक्त केली. चांगलं काम केलं म्हणून आपल्याला यश मिळेल असं काही नसतं. मी तर मंत्री नाही. पण सगळ्या आमदारांचा सभापती आहे, असं उत्तर सभापती प्रा. शिंदे यांनी देशमुख यांना दिले. विधान परिषदेच्या सभापतीपदावर निवड झाल्याबद्दल राम शिंदे यांचा सोलापूर येथील शंकर नरोटे आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राम शिंदे यावेळी म्हणाले, "अलिकडच्या कालखंडात चांगले काम करून यश मिळेल असे नसते. जिल्ह्याला मंत्री बघायला मिळत नाही असे आमदार देशमुखांनी सांगितले. आम्ही दोघेजवळचे मित्र आहोत. मी आणि विजयकुमार देशमुख दोघेजण राज्यमंत्री होतो. पुढे मी कॅबिनेटमंत्री झालो."
काय म्हणाले देशमुख?"सोलापूरकडे भाजपचे मंत्री दुर्लक्ष करतात. पण प्रा. राम शिंदे यांनी सभापती झाल्यानंतर सोलापूरला भेट दिली. मी अनेक वर्षे विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेतला. प्रा. राम शिंदे पहिल्यांदा निवडून आले त्यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशातील व्यक्ती निवडून आल्याचे सर्वांना कौतुक झाले होते. मंत्री झाल्यावर ते जुन्या मित्रांना विसरले नाहीत," अशा भावना विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.
बारामतीकरांची किंमत...
आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आले आणि मी दोनवेळा पडलो पण माझ्या किमतीपेक्षा त्यांची किंमत ६२२ मतांनी जास्त आहे, असा टोला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सोमवारी लगावला. विधान परिषद सभापतिपदावरील निवडीबद्दल शिंदे यांचा जाहीर सत्कार झाला. यावेळी शिंदे म्हणाले, "मी संविधानिक पदावर आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याला मर्यादा आहेत. माझ्यापूर्वी सहा-सात सभापती झाले. पण ते सगळे वयस्कर होते. मी तरुण आहे. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. मी बारामतीवाल्यांबरोबर लढलोय आणि ६२२ मतांनी पडलो. त्यांचा इतिहास ६० वर्षांचा आहे. पण माझ्या मागे कोणाचा इतिहास नाही," असंही त्यांनी सांगितलं.