मंगळवेढा - मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे सुपुत्र व नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्या मंत्रालयात कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रात्री १२. ३० च्या सुमारास मरवडे गावात ही घटना घडली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी पत्नीवर गोळीबार केला आहे. सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पवार हे कौशल्य विभागात सचिव पदावर कार्यरत असून काल ते मुंबईहून गावाकडे आले होते. रात्री पती व पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे घरगुती वादातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय पवार हे सरदार सरोवर गाऱ्हाणे निराकरण प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार येथे होते. अडीच वर्षे त्यांनी येथे काम केले तीन वर्षांपूर्वी त्यांची येथून बदली झाली होती. शांत व जास्त न बोलणं असा विजयकुमार भागवत पवार यांचा स्वभाव होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड,पोलीस नाईक हरिदास सलगर हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.