सोलापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अहिल्यादेवी सिंचन योजनेतून खोदलेल्या विहीर लाभार्थ्यांना उत्तर तालुका पंचायत समितीने चांगलीच अद्दल घडवली आहे. विहिरींची कामे पूर्ण करून दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांना पैसे देण्यास तयार नाहीत. पूर्ण विहिरीचे पैसे मिळत नाहीत व मंजूर विहिरींची कामे सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने योजनाच ठप्प झाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, बीबीदारफळ, रानमसले, भागाईवाडी, गावडीदारफळ, एकरुख, हगलूर, हिरज, कळमण, नान्नज, पडसाळी व पाकणी या १२ गावांत ७२ विहिरींना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये मंजुरी दिली. २ जानेवारी रोजी भागाईवाडी व बीबीदारफळच्या चार शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर ८ मार्च, २४ जुलै व ९ सप्टेंबर अशा ७२ विहिरी मंजूर केल्या. सीईओंनी मंजूर केलेल्या विहिरी पूर्ण करण्याची जबाबदारी पंचायत समितीची आहे.
मंजूर विहिरींची कामे सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना अकुशल कामाचे पैसे मिळताना अनेक अडचणी आल्या. त्यातूनही शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्चून विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. याला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. दीड वर्षापासून हे शेतकरी रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मात्र कुशल कामाचे साधारण दीड व त्यापेक्षा अधिक रक्कम मिळत नाही. एकतर शासनाकडून मिळणाऱ्या पैशातून विहिरीचे काम होत नसल्याने काही रक्कम पदरची घालावी लागते. शिवाय मिळणारी रक्कमही दीड वर्षापासून अडकल्याने शेतकऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. पूर्ण झालेल्या २४ विहिरींचे पैसे मिळत नाहीत. शिवाय पूर्ण झालेल्या विहिरींचे पैसे मिळत नसल्याने सुरू असलेली कामेही शेतकऱ्यांनी बंद केली आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत विहिरींची कामे थांबली आहेत.
---
सही करणाऱ्यांची अपेक्षा..
गरिबांचे घरकुल असो अथवा अल्पभूधारक शेतकऱ्यांची विहीर असो सही करणाऱ्या प्रत्येकालाच अपेक्षा असते. त्यामुळे घरकुल व विहिरींना मिळ्णाऱ्या पैशातून काही रक्कम अशीच जाते.
---
४८ विहिरींची कामे अर्धवट
बीबीदारफळ व गावडीदारफळ प्रत्येकी पाच, रानमसले व पडसाळी प्रत्येकी चार, अकोलेकाटी व कळमण प्रत्येकी दोन, साखरेवाडी येथील एक अशा २४ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.
४८ विहिरींची कामे मागील दोन वर्षांपासून अर्धवट आहेत. पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी कोणी स्वतःचे, कोणी व्याजाने तर कोणी उसनवारीच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले. त्यांचेच पैसे दोन वर्षांपासून मिळत नसल्याने उर्वरित शेतकरीही कामे पूर्ण करण्याचे धाडस करीत नाहीत.
---
मंजूर विहिरींचे काम पूर्ण करा म्हणून अधिकाऱ्यांनी तगादा लावला. चार लाख खर्च केले. एक लाख ६० हजार रुपये मिळाले. बिडीओ शेख यांना सांगितले तरी बिल मिळत नाही. कोणाला भेटले तर पैसे मिळतील?.
- जयश्री आबा लामकाने
अकोलेकाटी, लाभार्थी