चळे ते सुस्ते या ५ कि.मी. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून साधा मुरुमही या रस्त्यावर टाकला नाही. १९९५ साली रोजगार हमी योजनेतून या रस्त्याचे काम झाले होते. त्यानंतर मात्र रस्त्याचे काम केले नसल्याने प्रत्येक वर्षीच्या पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांना या रस्त्यावरून कसरत करतच चालवावे लागत आहे तर लहान मुले, नागरिकांना पाण्यातून, चिखलातून रस्ता शोधावा लागत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ झाली आहे, याचाही ग्रामस्थ, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. चळे ते सुस्ते रस्त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी सदस्य, खासदार यांनी अनेकवेळा रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. मात्र, ते पाच वर्षात एकदाही फिरकले नाहीत. अशा तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सूरज गायकवाड, दत्तात्रय गायकवाड यांनी केली आहे.