पंढरपूर : पंढरपूर तहसील कार्यालयाचे रेकॉर्ड रूम म्हणजे ‘आवो, जावो घर तुम्हारा’ असेच असून, कोणीही घुसून आपल्याच हाताने कागदपत्रे शोधत असतात. यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रेकॉर्ड रूममधील कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांना ते वेळोवेळी पुरवण्यासाठी १ लिपीक व २ कर्मचारी असा स्टाफ आहे. रेकॉर्र्ड रूममध्ये ग्रामीण भागातील जन्म मृत्यूचे दाखले, ६ ड व ८ अ चे फेरफार, नोटीस फॉर्म, कीर्दच्या शासकीय पावत्या व अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात, परंतु रेकॉर्ड रुममधील कागदपत्र व्यवस्थितरित्या ठेवण्याऐवजी ते कोणाच्याही हातात देण्याचे काम कर्मचार्यांकडून होते. यामुळे अनेक गावची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. मात्र तहसील कार्यालयात ग्रामस्थांना कागदपत्रे मिळण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना पैसे घेऊन कागदपत्र मिळण्याच्या दिवसाची पावती दिली जाते. कागदपत्रे गहाळ झाल्याने सामान्य ग्रामस्थांना कागदपत्र मिळत नाहीत व त्यासाठी वारंवार कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागतात. यामध्ये त्यांना विनाकारण पैसा खर्च करावा लागतो तर वेळही जात आहे. याबाबत रेकॉर्ड रुमचे काम पाहणार्या लिपीक पी बी. डोंबाळे यांना माहिती विचारली असता त्यांनी कागदपत्र गहाळ झाल्याचे मान्य केले. मात्र कोणकोणत्या गावाचे कागदपत्रांचे दप्तर गहाळ झाले आहे. विचारल्यास उडवा-उडवीची उत्तरे दिली. रेकॉर्र्ड रुममधील कर्मचार्यांच्या अशा कामामुळे ग्रामीण भागातील सर्व अतिमहत्त्वाची अधिक कागदपत्रे गायब किंवा गहाळ होऊ शकतात. त्यामुळे याठिकाणी अधिक काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे
. ----------------------
रेकॉर्ड रुममधील काही कागदपत्र गहाळ झाली आहेत; मात्र कोणकोणत्या गावाचे कागदपत्रांचे दप्तर गहाळ झाले आहेत हे सांगू शकत नाही. - पी. बी. डोंबाळे लिपीक , अभिलेख कार्यालय, तहसील पंढरपूर