पंढरपूर : वाशी (जि. ठाणे) येथील एका अल्पवयीन मुलीला आईने साबण घेऊन ये म्हणून दुकानाला पाठवले होते. ती मुलगी दुकानला जाते म्हणून शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास गेली मात्र दोनदिवस घरीच आली नाही. ती गायब झालेली काजल त्रिंबक कामिटे (वय १४) ही पंढरपुरमध्ये सापडली असून तीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोनि. किरण अवचर यांनी सांगितले.
लक्ष्मी त्रिंबक कामिटे यांनी कपडे धुण्याचे साबण आणण्यासाठी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानामध्ये काजलला पाठविले होते. त्यानंतर खूप वेळ झाला तरी काजल परत आली नाही. घरातील सर्वानी मिळून तिचा संपूर्ण परिसरात शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. काजल स्वत: घरी परत येईल म्हणून त्यांनी पोलीसांना कळविले नव्हते. शनिवारी त्यांच्या हद्दीतील पोलीस कामिटे यांच्या घरी गेले. मुलगी काजलबाबत चौकशी केली त्यावेळी लक्ष्मी यांनी काजल ही कालपासून कोणासही न सांगता निघून गेली आहे असे सांगितले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना तुमची मुलगी हि पंढरपूर पोलीस ठाण्यात येथे सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे काजलची आई लक्ष्मी, भाऊ शुभम, मेहुणे अशिष पंढरपूर पोलीस ठाण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून लेखी लिहुन घेतल्यानंतर पोनि. किरण अवचर, पोकॉ. प्रकाश कोष्टी, गजानन माळी, सुवर्णा जवळगे यांनी काजलला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आले.
असा लागला आई वडीलांचा शोध...
काजल पंढरपुरातील कासेगाव रस्त्याकडे एकटीच फिरताना पोलीसांना मिळून आली. पोलीसांनी तिची विचारपूस केली असता, एका आजी आजोबाने मला आमचेसोबत पंढरपूर येथे येते का असे विचारले. असता मी त्यांचेसोबत स्वताहून रेल्वे ने पंढरपूर येथे आले, त्यानंतर ते आजी आजोबा कुठे गेले हे मला माहित नाही. असे उत्तर तीने पोलीसांना दिले. तिला तिच्या कुटुबांती व्यक्तींचा मोबाईल नंबर देखील माहित नव्हता. परंतु तिने तिचा पत्ता पोलीसांना सांगितला. यानंतर पंढरपूर पोनि. किरण अवचर, पोकॉ. प्रकाश कोष्टी, गजानन माळी यांनी ती राहत असलेल्या हद्दीतील पोलीसांशी संपर्क साधला. व त्या पोलीसांना तिच्या घरी पाठवले. अशा पध्दतीने तिच्या आई वडीलांचा शोध घेण्यात आला.