कोरोना हा संसर्ग रोग असून याचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या संपूर्ण भारतात रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असून यामुळे केंद्रीय सरकार व राज्य सरकारच्या निर्देशानुसार शैक्षणिक क्षेत्रात आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे जवळपास सगळी महाविद्यालये आणि शाळा आॅनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
कालच बारावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर झाला. आता सर्वांचीच अॅडमिशनसाठी लगबग सुरू होणार आहे. प्र्रत्येक पालकाला चिंता असती की आपला पाल्याने दहावी/ बारावीनंतर काय करावे, कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या शाखेला पुढील काळात महत्त्व व नोकरीची संधी आहे, तंत्रशास्त्रामध्ये कुठला कोर्स निवड करायला पाहिजे असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येत असतात. त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे त्या शाखेत प्रवेश घ्यावा. त्यासाठी आपण आताच कोठे व कोणत्या महाविद्यालयात कोणत्या शाखा उपलब्ध आहेत. कोणत्या महाविद्यालयात चांगले शिक्षण मिळू शकते व त्यासाठी आपल्याला किती फी द्यावी लागेल. त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. याची संपूर्ण तयारी आताच केली तर निकालानंतर धावपळ होणार नाही.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया यांचे स्वत:चे वेळापत्रक असते व दिलेल्या वेळापत्रकानुसार विहित कालावधीमध्येही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत असते. त्याचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई (डीटीई)च्या संकेतस्थळावर किंवा वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाते आणि महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर पण आपल्याला पाहायला मिळू शकते.
कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असताना प्रत्यक्ष त्या महाविद्यालयाला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची चाचपणी करणे योग्य ठरत असते, परंतु सध्याच्या या परिस्थितीमुळे आपणास ते शक्य होणार नाही तेव्हा प्रवेश घेऊ इच्छिणाºया अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयाची संकेतस्थळ किंवा सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट या बघून काही अंदाज बांधता येऊ शकेल.दहावीनंतर प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे- दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडलेला दाखला, अधिवास (रहिवासी) दाखला, आठवी, नववी गुणपत्रिका,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जर आपण मागासवर्गीयामध्ये येत असाल तर जात/ जमात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र,आधारकार्ड, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या नावाने बँकेत खाते असणे व त्याला आधार क्रमांक संलग्नित असणे गरजेचे आहे.
बारावीनंतर प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे- दहावीची गुणपत्रिका, बारावीची गुणपत्रिका, महाविद्यालय सोडलेला दाखला, जेईई-(पेपर १)/ एम.एच.टी.सी.ई.टी-२०२० स्कोर कार्ड, अधिवास (रहिवासी) दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, जर आपण मागासवर्गीयामध्ये येत असाल तर जात/ जमात प्रमाणपत्र, जात/ जमात वैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या नावाने बँकेत खाते असणे व त्याला आधार क्रमांक संलग्नित असणे गरजेचे आहे.
जर आपल्या पाल्याला व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्यांनी राष्ट्रीयीकृत बँक/खासगी बँक किंवा अल्पसंख्याक समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत आपण शैक्षणिक कर्ज काढून आपल्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल. त्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
दहावीची गुणपत्रिका, बारावीची गुणपत्रिका, महाविद्यालय सोडलेला दाखला, उत्पन्न दाखला, जात/ जमात प्रमाणपत्र, जात/ जमात वैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या नावाने बँकेत खाते असणे व त्याला आधार क्रमांक संलग्नित असणे गरजेचे आहे, पॅनकार्ड (विद्यार्थी व पालक), ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्याची प्रवेशाची पावती, महाविद्यालयाचे फीस स्ट्रक्चर, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, सध्या राहण्याचा पुरावा- टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, लाईट बिल, पासपोर्ट, पालकांचं चालू तीन महिन्याचं पगारपत्रक, सध्या बँकेत पगार जमा झालेले महिन्याचे स्टेटमेंट, मागील दोन वर्षांचे फॉर्म-१६, दोन जामीनदार.
- मोहम्मद इक्बाल बागबान, (लेखक खादिमाने उर्दू फोरमचे संचालक आहेत.)