मंगळवेढा : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण आवश्यक असून, ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी नूतन तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला. दरम्यान तरुणांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘मिशन युवा स्वास्थ्य’मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान हाती घेण्यात आली आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी टीएचओ जानकर यांनी जय्यत तयारी केली आहे .
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनापासून स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरली आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील काही नागरिक गैरसमज, अफवांवर विश्वास ठेवून लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.अशा नागरिकांचे समुपदेशन करणे, लसीकरण शिबिर आयोजित करणे आणि लसीकरण केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे, कृती आराखड्याची अंमलबजावणी सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली टीएचओ डॉ भाऊसाहेब जानकर यांच्याकडून केली जात आहे.त्यानुसार लसीकरण केंद्रांना भेटी देऊन पात्र नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे.
त्यांनी बोराळे, सलगर, आंधळगाव , भोसे, मरवडे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच काही लसीकरण केंद्राला भेटी दिल्या. एकही लस न घेणाऱ्यांची नागरिकांची यादी तयार करून १०० टक्के लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना टीएचओ डॉ भाऊसाहेब जानकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या. दरम्यान भोसे येथील आठवडी बाजारात जाऊन विक्रेत्यांना, व्यापाऱ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले. अनेकांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन लसीकरण करण्यात आले.
......................................मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहीम--तालुक्यात १ लाख ६५ हजार लसीकरण उद्दिष्ट आहे . आजपर्यंत पहिला डोस ७७ हजार , दुसरा डोस २२ हजार ८४५ नागरिकांनी घेतला आहे यामध्ये मिशन कवच कुंडल यामध्ये १० हजार नागरिकांनी डोस घेतला आहे. ...................................अफवांवर विश्वास ठेऊ नका....ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात गैरसमज व अफवा असल्याने काही जण लस घेण्यासाठी समोर येत नाही. कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, मिशन युवा स्वास्थ्य’मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान हाती घेण्यात आली असून तरुणांनी लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर यांनी केले आहे.