आमदार सातपुते यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना वीज बिलाची होळी, माळशिरस तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाचा प्रश्न यावर आवाज उठवून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. लक्ष वेधण्यासाठी त्यांनी विधानभवनात गळ्यात विद्युत पंप व स्टार्टर अडकवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला. याचवेळी त्यांनी वीज बिल फाडले.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यातील कृषी संवर्धनाच्या फळपीक विमा, पशुधन अधिकारी यांच्या रिक्त जागा, शेततळे, शेतकऱ्यांचे हितार्थ असे अनेक विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या बाबतीत काढलेले चुकीचे अध्यादेश शासनाने त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली.
या वर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल ३१ हजार १५० फळपीक शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. तरीही या शेतकऱ्यांना शासनाने काढलेल्या जीआरमुळे फळपीक विमा मिळणार नाही. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
पोषण आहारावर उठवला आवाज
बालके व गर्भवती स्त्रियांच्या पोषण आहार संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. पोषण आहार शिजवण्याचे ११ वर्षांपासूनचे कंत्राट अचानक बंद झाल्यामुळे राज्यातील हजारो बचत गटांतील महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिला बचत गट हे महिलांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे बचत गटातील स्थानिक महिलांचा रोजगार जाऊ न देता आहाराचे केंद्रीकरण व खासगीकरण न करता पूर्वीप्रमाणेच महिला बचत गटांना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात यावे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली होती.
विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रश्न रेंगाळला आहे. स्थिरीकरण योजनेकडे राजकीय हेतूने पाहिले जाऊ नये. स्थिरीकरण योजनेकडे राजकीय हेतूने पाहिले जाऊ नये, अशी मागणी सभागृहात केली.
३४५० शेततळी रेंगाळली
कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा तुटवडा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती या नैसर्गिक संकटग्रस्तांना नुकसानभरपाई देताना प्रशासनाची झालेली संभ्रमावस्था, हमीभावाने शेतकऱ्यांकडून पूर्ण मका खरेदी केली गेली नाही. पोल्ट्री व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये परीक्षा चालू असताना त्यांचे वीज कनेक्शन तोडणे यांसह जिल्ह्यातील ३४५० शेततळी रेंगाळली असून, त्यासाठी १६ कोटी ८० निधी मिळावा, अशा अनेक मुद्द्यांवर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सभागृह व सरकारचे लक्ष वेधून घेतले.
माझे प्रश्न मार्गी : माने
मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी मी सत्तेतील आमदार असल्याने मतदारसंघातील प्रश्न त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडे मांडतो. ते सर्व प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे मला सभागृहात प्रश्न मांडण्याचे आवश्यकता भासत नसल्याचे सांगितले.
-
कुष्टरोग वसाहत निधीसाठी खास तरतूद हवी : प्रणिती शिंदे
अतिजोखमीच्या रुग्णांना लस देण्याची घाई केली जात आहे. त्यांना माहिती न देता लस दिल्याने साईड इफेक्टचा धोका आहे. रुग्णांची तपासणी करुनच ती लस दिली जावी यासह कुष्टरोग वसाहतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. विविध घरकूल आहेत मात्र या वसाहतीसाठी तरतूद नाही. त्यासाठी खास निधीची तरतूद करावी, यासाठी आ. प्रणिती शिंदे यांनी विधानभवात अधिवेशनामध्ये आवाज उठवला.